लातूर दि.3 (जिमाका):- कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना प्रतिबंधक लस देण्यास आजपासून सुरूवात झाली असून पालकांनी कोणत्याही प्रकारची काळजी न करता आपल्या पाल्यांना लस केंद्रावर नेऊन लस दयावी, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
मागच्या काही दिवसात कोरोनाच्या रूग्णांत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी किंवा या लाटेचा प्रभाव कमी रहावा यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना आखल्या आहेत. त्याची काटेकोर अमंलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री अमित देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.
१५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम आजपासून सुरू झाली आहे. त्यासाठी लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. लसीकरण केंद्रावर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामूळे पालकांनी कोणत्याही प्रकारची काळजी न करता आपल्या पाल्यांना निश्चीत केलेल्या केंद्रावर जावून आपल्या मुलाचे लसीकरण करून घ्यावे, या कामी शिक्षक, संस्थाचालक तसचे सामाजिक संस्थानी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
१८ वर्षावरील जे कोणी लस घेण्याचे राहून गेले आहेत त्यांनीही ताबडतोब लस घ्यावी, त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगरपरीषद आणि महानगरपालीकेत विशेष मोहिम राबवावी असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लातूर जिल्हयात जास्तीत जास्त परीणाम होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. संबंधित अधिकारी यांनी त्या सूचनांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने मोहिम राबवावी. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सर्वतोपरी सहकार्य आणि योगदान देवून आपले गाव आणि शहर सुरक्षित बनवावे असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment