पाटणा;
देशात बेरोजगारीने किती रौद्ररुप धारण केले आहे याची झलक आता मिळू लागली आहे. RRB-NTPC निकालावरून बिहारमध्ये विद्यार्थ्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. आजही (ता.२६) बिहारमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आणि यादरम्यान एका ट्रेनला आग लावण्यात आली.
संतप्त विद्यार्थ्यांनी यार्डात उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनला आग लावली. ट्रेनला आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी पोहोचावे लागले. पोलिस विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आंदोलक विद्यार्थीही पोलिसांच्या हाताबाहेर गेले आहेत. दुसरीकडे गया रेल्वे स्टेशन परिसरात विद्यार्थ्यांनी चालत्या ट्रेनवर दगडफेक केली.
संतप्त विद्यार्थ्यांनी अनेक गाड्यांना लक्ष्य केले आणि श्रमजीवी एक्स्प्रेसचेही मोठे नुकसान केले. ज्यामध्ये जेहानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक जाम केला आणि नंतर पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळला. यासोबतच सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यात अपयश आले.
हा विरोध रेल्वे भर्ती बोर्डाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (RRB NTPC) परीक्षेच्या निकालातील कथित अनियमिततेच्या कारणावरून केला जात आहे.
रेल्वे मंत्रालयाने परीक्षा पुढे ढकलली
रेल्वे मंत्रालयाने आजच्या NTPS आणि लेव्हल-1 या दोन्ही रेल्वे परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे जी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची मते ऐकून त्या आधारे अहवाल तयार करेल. हा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर रेल्वे मंत्रालय पुढील निर्णय घेईल.
No comments:
Post a Comment