मुंबई, दि 14 : नागरिकांसाठीच्या तब्बल 80 सुविधा त्यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ द्वारे सहजपणे उपलब्ध करून देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका असून माहिती तंत्रज्ञानाचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचे हे उत्तम उदाहरण आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले. नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’ या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी विविध समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, ‘व्हॉट्सअप चॅट-बॉट’द्वारे जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ‘आपली मुंबई, माझी मुंबई’ साठी सातत्याने कार्यरत असणाऱ्यादेशातील क्रमांक एकच्या महानगरपालिकेद्वारे ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकाद्वारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित करत या सुविधेचा स्वतः वापर करत लोकार्पण केले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पाहता लोकांसाठी काम करावे. महापालिका असो किंवा शासन, या यंत्रणांशी थेट व सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते, ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली आहे. महापालिका रोज काय काम करते ? या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
तंत्रज्ञानस्नेही संक्रमण
मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, येणाऱ्या काळात इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास आहे. ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिले आहे. माय बीएमसी ट्विटर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येत असून चॅट-बॉट हे पुढचे पाऊल आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी होत असलेले तंत्रज्ञानस्नेही संक्रमण हे अत्यंत चांगल्या दिशेने होत आहे. मुंबईकरांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने करीत असलेल्या लोकाभिमुख प्रयत्नांचा त्यांनी याप्रसंगी आवर्जून उल्लेख केला.
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, उत्तम जागतिक सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याच्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या परिवर्तनशील पाऊलांचे नेहमीच खूप कौतुक वाटते. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधित बाबी मुंबईकरांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई शहर अतिशय वेगाने आणि चांगल्या पद्धतीने बदलत आहे. कोविड काळात मुंबई पालिकेने केलले काम खूप कौतुकास्पद आहे, ज्याची दखल जागतिक आरोग्य संघटना व वर्ल्ड बँक यांनीही घेतली आहे.
महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन देण्यात महानगरपालिका नेहमीच अग्रेसर असते. याच शृंखलेत आता ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर केवळ एक व्हॉट्सअप संदेश पाठवून नागरिकांना विविध सेवा-सुविधा व माहिती उपलब्ध होणार आहे, ही निश्चितच कौतुकास्पद व अभिनंदनीय बाब आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नमूद केले की, नागरिकांना घरबसल्या गणेशोत्सव मंडप परवानग्या, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक यासारखी विविध माहिती सहजपणे उपलब्ध होणार आहे.
व्हॉट्सअप कंपनीचे संचालक (सार्वजनिक धोरण) शिवनाथ ठुकराल यांनी नागरिकांना सेवा-सुविधा देण्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तंत्रज्ञानस्नेही व लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक करीत अभिनंदन केले. ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेद्वारे नागरिकांना तब्बल ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका असल्याचाही श्री. ठुकराल यांनी आवर्जून उल्लेख केला.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, सहाय्यक आयुक्त (माहिती तंत्रज्ञान) शरद उघडे, यांच्यासह महानगरपालिकेतील विविध खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेची ठळक वैशिष्ट्ये
१. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे.
२. ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘Namaste किंवा Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे २ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे ३ पर्याय उपलब्ध होतात. यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या पर्यायानुसार महानगरपालिकेच्या सेवा-सुविधांशी संबंधित पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात.
३. वरीलनुसार आपल्या आवश्यकतेनुसार नागरिकांद्वारे जे-जे पर्याय निवडले जातील, त्या-त्या पर्यायानुसार तब्बल ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होते. यामध्ये संबंधित पत्ते, संपर्क क्रमांक, संक्षिप्त माहिती यासारख्या बाबींचा समावेश आहे.
४. या सुविधे अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या८० सेवा-सुविधांविषयीची माहिती ही ‘लोकेशन’ आधारित पद्धतीने उपलब्ध होत असल्याने एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांपैकी कोणत्या विभागात आहे, याची माहिती अत्यंत सहजपणे व तात्काळ स्वरुपात उपलब्ध होत आहे.
५. वरीलनुसार लोकेशन आधारित पद्धतीने ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ द्वारे माहिती उपलब्ध होत असल्यामुळे एखाद्या व्यक्तिच्या ठिकाणाजवळ असणारे महानगरपालिका दवाखाने – रुग्णालये, कोविड केअर सेंटर, मनपा शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रे इत्यादी बाबींची माहिती तात्काळ उपलब्ध होत आहे.
६. या सुविधेद्वारे तक्रार वा सूचना करण्याची सेवा उपलब्ध आहे.
७. महानगरपालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधित अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध.
८. महानगरपालिकेशी संबंधित विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी यूपीआय आधारित ऑनलाईन सेवा उपलब्ध.
९. महानगरपालिकेशी व महानगरपालिका क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडींची अद्ययावत माहिती उपलब्ध.
१०. महानगरपालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधित प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी विषयीची माहिती.
११. ही सुविधा दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सातही दिवस (24 x 7) पद्धतीने व भ्रमणध्वनी ॲपद्वारे सहजपणे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना घरबसल्या व अत्यंत सहजपणे माहिती उपलब्ध होणार आहे.
१२. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नसून केवळ व्हॉट्सअपद्वारे ८९९९-२२-८९९९ या क्रमांकावर एक संदेश पाठवून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qqIwQI
https://ift.tt/3I8sb9h
No comments:
Post a Comment