कोरोना रुग्णसंख्येत भयावह वाढ! २४ तासांत नवे ९०,९२८ रुग्ण, ३२५ जणांचा मृत्यू - latur saptrang

Breaking

Thursday, January 6, 2022

कोरोना रुग्णसंख्येत भयावह वाढ! २४ तासांत नवे ९०,९२८ रुग्ण, ३२५ जणांचा मृत्यू





 नवी दिल्ली;

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या २४ तासांत नवे ९०,९२८ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनातून १९,२०६ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा रोजचा पॉझिटिव्हिटी दर ६.४३ टक्के इतका झाला आहे. सध्या देशात २ लाख ८५ हजार ४०१ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या २,६३० वर पोहोचली आहे. यातील ९९५ रुग्ण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक ७९७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर दिल्लीत आतापर्यंत ४६५ रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात रूग्णसंख्येत ५६ टक्क्यांची भयावह वाढ नोंदवण्यात आली.

देशात मंगळवारी दिवसभरात ५८ हजार ९७ कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, १५ हजार ३८९ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. दरम्यान कोरोना मृत्यू संख्येतही वाढ दिसून आली असून मंगळवारी दिवसभरात ५३४ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. सोमवारी २४७ च्या तुलनेत मंगळवारी कोरोनामृत्यूच्या संख्येत दुप्पट वाढ नोंदविण्यात आली होती.

दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सायन येथील आणखी ३० निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोनाबाधित डॉक्टरांची संख्या २६० वर गेली आहे.

देशात कोरोना रुग्णांची होत असलेली वेगाने वाढ आणि तिसर्‍या लाटेच्या शक्यतेने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अंशतः कोरोनाची लक्षणे असल्यास अथवा कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी गृह विलगीकरणासाठीची नवीन नियमावली बुधवारी जारी केली. (Home Isolation Rule)

रुग्ण कमीत कमी 7 दिवसांत पॉझिटिव्ह आढळला नाही तर आणि सलग तीन दिवस ताप नसल्यास रुग्णाचे गृह विलगीकरण संपविण्यात येईल, त्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाने आपल्या खासगी वस्तू कोणालाही वापरण्यास देऊ नयेत. तसेच ऑक्सिजनचे प्रमाण आणि नियमितपणे शरीराच्या तापमानाची तपासणी करावी.

तसेच नियमित तीन स्तरांचा मास्क घालून 72 तासांनंतर त्याची विल्हेवाट लावावी, नियमितपणे हात धुण्यासह शरीरातील पाणी कमी होऊ नये, याकडे लक्ष्य देण्याच्या सूचना मंत्रालयाने दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment