इस्रायली जनतेमध्ये महात्मा, मोदी आणि मेहता लोकप्रिय : कोबी शोशानी - latur saptrang

Breaking

Saturday, January 29, 2022

इस्रायली जनतेमध्ये महात्मा, मोदी आणि मेहता लोकप्रिय : कोबी शोशानी

मुंबई, दि. 29 : इस्रायलच्या लोकांमध्ये महात्मा गांधी, इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व संगीत संयोजक झुबीन मेहता अतिशय लोकप्रिय असून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम असल्याचे इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी सांगितले.

कोबी शोशानी यांनी शुक्रवारी (दि.28) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. या महिन्यात इस्रायल-भारत यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात इस्रायल-भारत संबंध अतिशय दृढ झाल्याचा अभिमान वाटतो, असे शोशानी यांनी सांगितले. आपण स्वतः दुर्गप्रेमी असून महाराष्ट्रातील काही शिवकालीन किल्ल्यांना भेट दिली असल्याचे  सांगून इस्रायल येथील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबत विचारविनिमय सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

इस्रायल भारताला जल व्यवस्थापन, निःक्षारीकरण, जलसिंचन, या क्षेत्रात सहकार्य करीत असून इस्रायलने भारतात कृषी उत्पादन वाढविण्यासाठी 29 सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापित केले असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके हिब्रू भाषेत असली तरीही स्नातकपूर्व अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत उपलब्ध असून परकीय विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने इस्रायल येथे शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायलच्या स्थापनेवर लिहिलेली ‘एक्झोडस’ ही जगप्रसिद्ध कादंबरी आपण वाचली असून ती वाचताना अनेकदा भावुक झाल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारताने ज्यू धर्मीय किंवा कुठल्याही परधर्मीय लोकांबाबत भेदभाव ठेवला नाही, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले. इस्रायल-भारत संबंध अतिशय सुदृढ झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

बैठकीला इस्रायल वाणिज्य दूतावासातील राजकीय व विशेष प्रकल्प सल्लागार अनय जोगळेकर हेदेखील उपस्थित होते.



from वृत्त विशेष – महासंवाद https://bit.ly/3HbBgyf
https://bit.ly/3GblJNq

No comments:

Post a Comment