वनामती आणि रामेती संस्थांमधून यापुढे शेतकरी, शेतमजुरांनाही प्रशिक्षण - latur saptrang

Breaking

Tuesday, January 11, 2022

वनामती आणि रामेती संस्थांमधून यापुढे शेतकरी, शेतमजुरांनाही प्रशिक्षण

मुंबई, दि. 11 – राज्यातील कृषि आणि कृषि संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देतानाच वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) आणि प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी (रामेती) यापुढे महिला, शेतकरी, शेतमजूर यांनाही कृषिविषयक कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, हे घटकही कृषि विस्ताराचे काम करीत असल्याने त्यांच्या प्रशिक्षणासाठी नियोजन आणि धोरण तयार करा, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या. प्रामुख्याने या संस्था कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात.

वनामती आमि रामेती यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम आणि नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, वनामतीचे संचालक उदय पाटील, संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांच्यासह कृषि विभागाचे अधिकारी, वनामतीचे अधिकारी, विविध रामेतीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले की, कृषि अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण ही संस्था घेते ही चांगली बाब आहे. मात्र, सध्या अधिक व्यापक विचार करण्याची गरज आहे. कृषि विकासासाठी पूरक घटकांना प्रशिक्षण दिले तर कृषि विषयक योजनांची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. सन 2022 हे वर्ष आपण कृषि क्षेत्रासाठी महिला वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषि योजनांचा महिलांना अधिकाधिक लाभ देऊन त्यांना प्रगतीच्या दिशेने आपण नेऊ शकू. प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

सध्या राज्य शासनाचा भर हा शेतकऱ्यांना आर्थिक बळकट बनविणे हा आहे. त्यासाठी बाजारपेठेची गरज ओळखून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविली जात आहे. त्या अनुषंगाने महिला, शेतकरी, शेतमजूर, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट यांना प्रशिक्षण दिले तर खऱ्या अर्थाने कृषि विस्ताराची संकल्पना आपण पुढे घेऊन जाऊ, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी वनामती आणि रामेतीच्या प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. याठिकाणी प्रशिक्षण सुविधा वाढविणे आवश्यक आहे. यशदाच्या धर्तीवर याठिकाणी काम होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नियोजन तयार करणे अपेक्षित आहे. कृषि क्षेत्रात सातत्याने बदल होत आहे. या बदलाची नोंद प्रशिक्षण कार्यक्रम आखताना करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाचे धोरण या संस्थांच्या माध्यमातून पुढे जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कृषि सचिव श्री. डवले यांनी, प्रशिक्षण संस्थेने बदलत्या काळाची गरज ओळखून यापुढे कार्यरत राहावे. अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करुन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्य निर्मिती व्हावी असे सांगितले. आयुक्त धीरजकुमार यांनी, याठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्यांनी दिलेल्या  प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यांची नोंद घेतली जावी, असे सुचविले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3FkOXZU
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment