मुंबईच्या धर्तीवर लातूरातही मालमत्ता कर माफी द्या
भाजपाची आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणीलातूर/प्रतिनिधी ः- महाराष्ट्र राज्य सरकारने काही दिवसापुर्वीच मुंबई महानगर पालिका क्षेत्रांतर्गत 500 स्के.फुट मालमत्ताधारकांना करमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच धर्तीवर लातूर शहर मनपा हद्दीतील 500 स्के. फुट आकाराच्या मालमत्ताधारकांना करमाफी देण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन करून तो ठराव राज्य सरकारकडे सादर करावा अशी मागणी भाजपाचे मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे व शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मनपा आयुक्त अमन मित्तल व महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीने काही दिवसापुर्वीच मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणार्या 500 स्के. फुट मालमत्ताधारकांना मनपाच्या करात माफी देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकतीत घेतलेला आहे. हा निर्णय केवळ मुंबई शहरापुरता लागू न करता त्याच धर्तीवर लातूर महानगरपालिकेलाही लागू करावा अशी लातूरकरांकडून मागणी होत आहे. लातूरकरांची जनभावना लक्षात घेऊन भाजपाने याबाबत मनपा आयुक्त व महापौरांना निवेदन दिलेले आहे. भाजपाचे मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंंडे व शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईच्या धर्तीवरच लातूर महानगरपालिकेने सुद्धा मनपा क्षेत्राअंतर्गत येणार्या 500 स्के. फुट अंतर्गत येणार्या मालमत्ताधारकांना करमाफी देण्यासाठी ठराव घ्यावा. याकरीता विशेष महासभेचे आयोजन करून यामध्ये प्रस्ताव मंजूर करून तो प्रस्ताव राज्यसरकारकडे सादर करावा अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे सदर निर्णयामुळे लातूरमधील सर्वसामान्य जनतेसह प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत येणार्या लाभार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. या करमाफीमुळे अनेकांच्या आर्थिक समस्याही सुटण्यास मोठी मदत होणार असल्याने राज्य सरकारकडे याबाबत प्रस्ताव दाखल करून हा प्रस्ताव मंजूर व्हावा याकरीता पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणीही या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त अमन मित्तल व महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर मनपा गटनेते अॅड. शैलेज गोजमगुंडे, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, स्थायी समिती सभापती अॅड. दिपक मठपती, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, अजय दुडीले, सुनिल मलवाड, प्रविण अंबुलगेकर, रागिणी यादव, ज्योती आवसकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
No comments:
Post a Comment