coronavirus : 'चिंता वाढवणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र...' - latur saptrang

Breaking

Thursday, January 20, 2022

coronavirus : 'चिंता वाढवणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र...'


 नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील करोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ३ लाखांवर नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. खासकरून महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश ही 'चिंता वाढवणारी राज्ये' आहेत. आम्ही या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथके पाठवली आहेत आणि परिस्थितीचा सतत आढावा घेत आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.


आशियाई देशांमध्ये ४ आठवड्यांत करोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. भारतातही करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी उसळी दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे १० राज्यांमध्ये त्यात महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान ही राज्ये टॉप टेनमध्ये आहेत. कारण या राज्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे राजेश भूषण म्हणाले.

करोनाची तिसरी लाट सुरू, केंद्राने केले मान्य

देशात देण्यात येत असलेल्या करोनावरील लशी या प्रभावी आहेत. लसीकरणामुळे करोना मृत्युंचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. करोनाच्या या तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या आणि मृत्युही मोठा प्रमाणात कमी झाले आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ३० एप्रिल २०२१ मध्ये ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर ३, ०५९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी करोनाचे ३१ लाख अॅक्टिव्ह रुग्ण होते, असे राजेश भूषण यांनी सांगितले.


शास्त्रीय पुरावे मिळाल्यानंतर लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर १५ वर्षांखालील मुलांचे लसीकरण करायचे की नाही? याचा निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले. तसेच मार्केटमध्ये दोन लशी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबतची शिफारस CDSCO ने DCGI म्हणजे औषध नियंत्रकाकडे केली आहे. याबाबत अंतिम निर्णय हा नियंत्रक घेईल, असे राजेश भूषण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment