Omicron in Maharashtra Update : महाराष्ट्रात अजूनही ओमिक्रॉनपेक्षा डेल्टा व्हेरियंटचा कहर; 'त्या' रिपोर्टमधून खुलासा - latur saptrang

Breaking

Sunday, January 16, 2022

Omicron in Maharashtra Update : महाराष्ट्रात अजूनही ओमिक्रॉनपेक्षा डेल्टा व्हेरियंटचा कहर; 'त्या' रिपोर्टमधून खुलासा




 मुंबई: मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात (maharashtra) नवीन करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असली तरी, डेल्टा व्हेरियंटचा (Delta Variant) प्रादूर्भाव अधिक दिसून येत आहे. ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटने धास्ती वाढवलेली असतानाच, राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अजूनही बहुतांश रुग्णांना डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे जीनोम सिक्वेन्सिंगमधून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, करोना विषाणूचा हा व्हेरियंट गेल्या वर्षी एप्रिल-मे या कालावधीत अधिक घातक ठरला होता.


आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी बुधवारी आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ४२०० हून अधिक नमुन्यांपैकी ६८ टक्क्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आला आहे. तर ३२ टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधिक आढळले आहेत.

ओमिक्रॉनचे आतापर्यंत १७३० रुग्ण

करोना विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचे रुग्ण सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबर २०२१ मध्ये आढळून आल्यानंतर भारतात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा फैलाव झाला होता. महाराष्ट्रात शनिवार रात्रीपर्यंत १७३० ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
६८ टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट 

डॉ. व्यास यांच्या पत्रानुसार, मागील १ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४२६५ रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील ४२०१ नमुन्यांचे चाचणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या अहवालातून स्पष्ट झाले आहे की, १३६७ नमुने म्हणजेच ३२ टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट, तर ६८ टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळला आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवार (१२ जानेवारी) पर्यंत राज्यात २, ४०, १३३ रुग्ण उपचाराधीन असून, त्यातील ९० टक्के रुग्ण घरी विलगीकरणात आहेत किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, नागपूर आदी भागांत करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे काही तथ्य लक्षात घ्यायला हवेत, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment