आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ - latur saptrang

Breaking

Monday, February 14, 2022

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस प्रारंभ

नाशिक, दि. 14 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र – 2021 अभ्यासक्रमाच्या परीक्षेस आज प्रारंभ झाला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम व अंतिम वर्षाच्या परीक्षा व दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, स्पीच लॅंग्वेज पॅथालॉजी, ऑडिओलॉजी आदी विषयांच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत आहेत.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, परीक्षेसंदर्भात विद्यापीठाचे मा. कुलगुरु व मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांचे मार्गदर्शन आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने व कोविड सुरक्षित वातावरणात घेण्यात येणार आहेत. यासाठी परीक्षा केंद्र व परीक्षा खोल्यांची संख्या वाढविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सदर परीक्षा राज्यातील 40 परीक्षा केंद्रांत परीक्षा घेण्यात येत अूसन या परीक्षेसाठी 2335 विद्यार्थी प्रविष्ट आहेत.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क परिधान करणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन व लिक्विड सॅनिटायझारचा वापर करण्याबाबत केंद्रप्रुखांना निर्देशित करण्यात आले आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.

परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक, अंतर्गत दक्षता पथक, केंद्रप्रमुख, केंद्र निरिक्षक, भरारी पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा खोल्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) वितरीत करण्यात आली आहेत. हिवाळी -2021 परीक्षेसाठी प्रति परीक्षा केंद्र रुपये वीस हजार इतक्या रकमेची अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली आहे.

परीक्षांच्या पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम, अतिविशेषोपचार व प्रथम वर्ष एम.बी.बी.एस जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा माहे डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा दि. 28 फेब्रुवारी ते दि. 21 मार्च 2022 कालावधीत घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा राज्यातील 184 परीक्षां केद्रांवर घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी 83948 इतके विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने वेळापत्रकानुसार होणार आहेत. परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/j7E3hc4
https://ift.tt/XonDdbU

No comments:

Post a Comment