‘दरबार हॉल’ लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र बनावे – राष्ट्रपती राम नाथ कोविंद - latur saptrang

Breaking

Friday, February 11, 2022

‘दरबार हॉल’ लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र बनावे – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

मुंबई, दि. 11 : आपल्या संविधानानुसार, ‘आम्ही भारताचे लोक’ हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह दरबार हॉल देखील लोककल्याणकारी उपक्रमांसाठी एक प्रभावी केंद्र बनेल, असे उद्‍गार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काढले.

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते  झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले, राजभवनात कोणतीही वैयक्तिक किंवा कोणतीही गोपनीय बाब नाही. जे काही घडते ते सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांसोबत, सार्वजनिकपणे पारदर्शकपणे, लोकसेवकांकडून जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याची पद्धत रूढ होत आहे. अशा प्रकारे हे नवे दरबार हॉल नव्या संदर्भातील आपल्या नव्या भारताचे, नव्या महाराष्ट्राचे आणि आपल्या चैतन्यशील लोकशाहीचे नवे प्रतिक आहे.

राजभवनाच्या या दरबार हॉलमध्ये मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी मोरारजी देसाई यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता अशी आठवण यावेळी राष्ट्रपतींनी जागविली. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे मला त्यांचे स्वीय सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र हे नावाप्रमाणेच महान राज्य असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, राज्याच्या महानतेला अनेक परिमाण आहेत. महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांचीच नावे मोजली तरी यादी संपणार नाही. शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक व्यक्तिमत्त्वांमध्ये महाराष्ट्राच्या महानतेचा असा अफाट प्रवाह दिसतो.

यापूर्वी अनेकदा महाराष्ट्रात यायची संधी मिळाली, मात्र यावेळच्या प्रवासात मला एक पोकळी जाणवतेय. असे सांगून राष्ट्रपतींनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयी शोकभावना व्यक्त केल्या. त्याच्यासारखी महान प्रतिभावान गायिका शतकात एकदाच जन्माला येतात. लताजींचे संगीत अमर आहे, जे सर्व संगीत प्रेमींना नेहमीच मंत्रमुग्ध करेल. यासोबतच त्यांच्या साधेपणाची आणि सौम्य स्वभावाची आठवणही लोकांच्या मनावर उमटणार आहे. मला व्यक्तिश: त्यांचा स्नेह मिळाला. त्यांचे जाणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. असे श्री कोविंद म्हणाले.

राजभवन हे जनता भवन व्हावे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

तिन्ही बाजूंनी समुद्रानी वेढलेल्या या राजभवनवर बाणगंगेचे, मुंबादेवीचे आणि सिद्धीविनायकाचे आशिर्वाद आहेत. राजभवन हे जनता भवन व्हावे. अशी इच्छा व्यक्त करुन राज्यपाल म्हणाले, राजभवन उभे रहावे यासाठी रात्रंदिवस कार्य करणाऱ्या मजुरांचे विशेष योगदान आहे. राज्यपाल म्हणून मला मिळालेल्या अधिकारात राहून मी जनतेच्या भल्याचे कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. वनजमिनीसंदर्भातील अपील करण्यासाठीचा अधिकार आधी जिल्हाधिकारी यांनाच होता आता तो अधिकार आयुक्तांकडे देण्यात आला. यामुळे हजारो लोकांना न्याय देता आला.

कोविड काळात उत्तम कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्याचा राजभवनमध्ये सत्कार करण्याचे सौभाग्य मला लाभले. सुमारे पाच हजार लोकांचा या दरम्यान सत्कार करण्यात आला. यात विद्यार्थी, नर्स, अधिकारी, अभिनेते, स्वच्छता कर्मचारी यांना सन्मानित करता आले हा मी माझा सन्मान समजतो.

मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असं देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. देशातील हे सर्वोत्तम राजभवन आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, ब्रिटीश गव्हर्नरचे हे चौथे निवासस्थान होते. या वास्तुने १०० वर्षाहून अधिक काळात घडलेल्या घडामोडी पाहिल्या आहेत. दि ३० एप्रिल १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी याच वास्तूत केले होते. ही नवीन रुप धारण केलेली वास्तु आहे. यात पुरातन आणि नवीनता याचा योग्य संगम साधला गेला आहे.

यापुर्वी विरोधीपक्षात असताना या राजभवनमध्ये येण्याचा योग आला असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना इथे बोलावले होते, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटण्यासाठी राजभवनवर आल्याच्या आठवणी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या.

आधुनिकता अंगी बाळगत असताना संस्कृती जपणे, जुन्या नव्याचा समतोल साधणे गरजेचे आहे. पारतंत्र्यांच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासाठी सज्ज झाली आहे.  या वास्तूत आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

राजभवन पार्श्वभूमी

  • दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या दरबार हॉलचे उदघाटन निश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा स्थगित करण्यात आला होता.
  • राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरचबांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता ७५० इतकी आहे. जुन्या हॉलची आसन  क्षमता २२५ इतकी होती.
  • जुन्या दरबार हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहालाबाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी ही अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.
  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे,शासकीय कार्यक्रम, पोलीस अलंकरण समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी  तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
  • इंग्लंडचे महाराजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ मध्ये झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता.त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.
  • शंभर वर्षांहून अधिक काळ लाटाव वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे २०१६ नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.
  • नव्या दरबार हॉलचे बांधकाम २०१९ मध्ये सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळेबांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर २०२१ मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.

दरबार हॉलचा इतिहास

  • दरबार हॉल हे आयताकृती सभागृह सन १९११ मध्ये बांधण्यात आले होते. राज्यपालांचे निवासस्थान असलेली’जलभूषण’ ही वास्तू तसेच राज्यपालांचे सचिवालय यांच्या मधल्या जागेत दरबार हॉल बांधण्यात आला.
  • दरबार हॉलच्या भव्य पोर्चच्या दर्शनी भागातजमिनीखाली राजभवनातील ऐतिहासिक तळघराचे (बंकर) प्रवेशद्वार आहे.  इथून नागमोडी वळणे घेत हे तळघर ‘जलचिंतन’ या अतिथीगृहाखालून उघडते.
  • दिनांक १० डिसेंबर १९५६ साली श्री प्रकाश यांनी जुन्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली त्यावेळी दरबार हॉलचे नाव’जल नायक’ असे होते.
  • दरबार हॉलच्या समोरील आणि मागील बाजूंना’जीवन वृक्ष’ ही संकल्पना असलेली सिल्क वस्त्रावर केलेली मोठी पेंटिंग्स होती.
  • बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीत राज्यपालांना विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे’दरबार हॉल’ किंवा ‘जल सभागृह’  हा राजभवनातील सर्वात व्यस्त परिसर असतो.

 

***

राजभवन/ राष्ट्रपती/अर्चना शंभरकर



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3gGxyCc
https://ift.tt/crUmS9u

No comments:

Post a Comment