वारसा जपण्यासाठी पुढील शंभर वर्षाचे नियोजन करून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार - latur saptrang

Breaking

Wednesday, February 16, 2022

वारसा जपण्यासाठी पुढील शंभर वर्षाचे नियोजन करून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.16 :- परळ-मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय 135 वर्षापूर्वीची इमारत आहे. देशात या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा वारसा जपण्यासाठी या ठिकाणी बांधण्यात येणारी इमारत पुढील शंभर वर्षाचे नियोजन करून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने बांधण्यात येणार असून या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पशुवैद्यक महाविद्यालय परळ-मुंबई येथे ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्राचे’ उद्घाटन आणि  गोरेगाव येथील विद्यार्थी वसतिगृह इमारतीच्या ऑनलाईन भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉ.आशिष पातुरकर हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, माणूस म्हणून आपण जे अन्नधान्य, खाद्यपदार्थ वापरतो, त्या अन्नधान्याची, खाद्यपदार्थांची सुरक्षितता जेवढी महत्त्वाची आहे. तेवढीच महत्त्वाची पशुखाद्याची सुरक्षितता आहे. माणसाच्या खाद्यपदार्थांत दूध, अंडी, मांस यासारख्या पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पादनांचा समावेश असतो. त्यामुळे ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्रा’चे महत्त्व मानवी आरोग्यासाठीही खूप अधिक असणार आहे.

जागतिक बँकेच्या सहकार्याने, कृषि, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सुरु होत असलेले हे नवीन संशोधन केंद्र, राज्यात उत्तम प्राणीजन्य अन्नपदार्थ निर्मितीसाठी, पशुधन समृद्धतेसाठी, पशुधनापासून मिळणाऱ्या दूध, अंडी, मांस आदी उत्पादन वाढीसाठी, शेतकरी व पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी उपयोगी ठरणार आहे.

प्राणीजन्य अन्नपदार्थ सुरक्षा संशोधन केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रात काम करणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे. देशात, राज्यात पशुजन्य अन्नपदार्थांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना पशुखाद्य गुणवत्तेची चाचणी व परीक्षण करण्यास या प्रयोगशाळेची मदत होईल.

पशुसंवर्धन विभागात शिक्षण घेणाऱ्या या महाविद्यालयात चांगले प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच राज्य आणि देशातील नागरिकांचे आरोग्य जपले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

आपल्या राज्यात अनेक प्रगत शेतकरी आहेत. प्रगतशील पशुपालक आहेत. मुंबई व्हेटर्नरी कॉलेजसारखी संस्था त्यांच्या पाठीशी आहे. ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्राचे’ उद्घाटन झालेली प्राणीजन्य अन्नपदार्थ सुरक्षा संशोधन केंद्रासारखी संस्था यापुढच्या काळात, राज्याच्या पशुधन समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार म्हणाले, राज्यामध्ये  ‘प्राणीजन्य अन्न सुरक्षेविषयी उत्कृष्ट प्रगत संशोधन केंद्रा’सारख्या प्रयोगशाळेची गरज होती. जगाशी स्पर्धा करताना गुणवत्ता नसेल तर स्पर्धा करू शकत नाही. या महाविद्यालयात सूक्ष्म चाचणी करण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ठिकाणच्या चाचणी केंद्रामुळे  मानवासाठी लागणाऱ्या पोषक पदार्थ अधिक वाढवण्यासाठी मास, मासे अंडी, यांची चाचणी झाल्यानंतर संशोधनातून योग्य प्रमाणात मिळण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुजन्य पदार्थ निर्मिती वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पशुपालनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला महत्त्व येत आहे शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना अतिशय लाभदायक ठरत असल्याचे मंत्री श्री.केदार यांनी सांगितले.

पशुसंवर्धन राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून, राज्यात पशुधन वाढ होण्यासाठी, पशुधनाच्या आरोग्यासाठी, सुरक्षेसाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत.राज्यामध्ये आणि देशामध्ये पशुजन्य अन्नपदार्थांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना प्राणिजन्य खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेची चाचणी व परीक्षण करण्यास या प्रयोगशाळेची फार मदत होणार आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/TchioO2
https://ift.tt/HrtgIfo

No comments:

Post a Comment