मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास करताना यंत्रणांनी जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी – ‘मुंबई इन ट्रान्झिट’ कार्यशाळेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना - latur saptrang

Breaking

Thursday, February 17, 2022

मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास करताना यंत्रणांनी जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी – ‘मुंबई इन ट्रान्झिट’ कार्यशाळेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचना

मुंबई, दि. १६ – सामान्य माणसाच्या जीवनमानात सुलभता यावी यासाठी एमएमआरडीए, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर संबंधित यंत्रणांनी पायाभूत सुविधांचा विकास करताना जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी, अशा स्पष्ट सूचना पर्यावरण व पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका, सामान्य नागरिक, नियोजक, तज्ञ, बेस्ट उपक्रम यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधांची माहिती आणि फायदे या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणातर्फे ‘मुंबई इन ट्रान्झिट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे सहआयुक्त राहुल कर्डिले यांचेसह मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

मुंबईत विशेषतः पश्चिम उपनगरात होत असलेल्या सकारात्मक बदलांकडे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी लक्ष वेधले. एमएमआरडीए आणि इतर संबंधित यंत्रणांशी सकारात्मक बदलाबाबत सातत्याने संवाद साधला जाईल, जेणेकरून सामान्य मुंबईकरांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘मुंबई इन ट्रान्झिट’  या कार्यशाळेत मेट्रो लाईन २अ आणि ७ चा पश्चिम उपनगरांवर होणारा परिणाम, बहुवाहतूक एकात्मिकरण, अंतिम गंतव्यस्थान जोडणी, एकात्मिक तिकिटीकरण प्रणाली आदी विषयांवर सादरीकरण करण्यात येऊन चर्चा करण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेशात वाहतूक व परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो मार्गाचा सुमारे ३३७.१ किलोमीटरचा (१४ मार्गिका) बृहत आराखडा तयार केला आहे, त्याची नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू आहे. सद्यस्थितीस मेट्रो बृहत आराखड्यामधील मेट्रो मार्ग-१ (वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर) या ११.८० कि.मी. मेट्रो मार्ग कार्यान्वित आहे. मेट्रो २अ आणि ७ चे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच टप्प्या-टप्प्याने खुले करण्याचे नियोजन आहे. तसेच मेट्रो मार्ग २ब ४, ४ अ, ५, ६, ७अ आणि  ९ चे बांधकाम सुरु आहे.  मेट्रो मार्ग १०, ११, १२ ची प्रत्यक्ष अंमलबजावणीची कामे लवकरच सुरु होणे अपेक्षित आहेत. मेट्रो मार्ग ८, १३ व १४ चे नियोजन प्रगतिपथावर असल्याची माहिती यावेळी एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आली.मेट्रो २अ आणि ७ लवकरच  खुली करण्याचे नियोजन असल्याने या या मार्गिकांची माहिती मुंबईकरांना व्हावी या दृष्टीने प्रचार-प्रसिद्धी आणि जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/sP4chYo
https://ift.tt/Ujxtz3f

No comments:

Post a Comment