‘सोयाबीन डिजिटल शेती शाळा पूर्व मशागत ते कापणीपर्यंत’ या पुस्तकाचे लोकार्पण - latur saptrang

Breaking

Tuesday, February 22, 2022

‘सोयाबीन डिजिटल शेती शाळा पूर्व मशागत ते कापणीपर्यंत’ या पुस्तकाचे लोकार्पण

मुंबई दि, 22 : राज्यात सोयाबीनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबीन डिजिटल शेती शाळा हे पुस्तक ज्या भागात सोयाबीन क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवू. या पुस्तकात शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल, असा विश्वास कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

‘सोयाबीन डिजिटल शेती शाळा पूर्व मशागत ते कापणीपर्यंत’ या पुस्तकाचे लोकार्पण कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले. पाणी फाऊंडेशन, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान, पाणी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांतकुमार पाटील, संचालक (संशोधन व विस्तार शिक्षण) डॉ.शरद गडाख, तसेच सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पाणी फांऊडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ म्हणाले, राज्यात दि. 21 मे ते 3 ऑक्टोबर 2021 दरम्यान या शेतीशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक होते.  ‘सोयाबीन डिजिटल शेती शाळा’ हे पुस्तक ऑनलाइन स्वरुपातही उपलब्ध असणार आहे. याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना  होणार आहे. या फार्म शाळेसाठी 46 हजार 327 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 197 वॉट्सअप ग्रुपमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग होता. 13 लाईव्ह प्रश्नोत्तराची सत्र आयोजित करण्यात आली. यामध्ये 5 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभागी घेऊन सोयाबीन उत्पन्न वाढीसाठी विविध प्रश्न विचारले. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील मराठी भाषिक समुदायांनीही या फार्म स्कूलसाठी नोंदणी केली आहे. पूर्व मशागत ते कापणी असे सोयाबीनविषयक 23 ट्रेनिंग व्हिडीओ तयार करुन 197 वॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यात आले. त्यामध्ये शेती उत्पन्नाच्या सुधारित पद्धतीविषयी, जसे बियाणे निवड, उगवण क्षमता, तपासणी, बीजप्रक्रिया, बीबीएफवर पेरणी, तण नियंत्रण हात कोळपे, एकात्मिक खत व्यवस्थापन, ग्रेडींग, पॅकींग, मार्केटींग आदी विषयी माहिती पाणी फांऊडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांनी यावेळी दिली.

कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, पाणी फांऊडेशन ही संस्था अनेक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. कोविडच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रत्यक्ष जाऊ शकत नसल्याने शेती क्षेत्रात नवीन प्रयोग म्हणून ‘सोयाबीन डिजिटल शेती शाळा’ या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कृषिमंत्री श्री.भुसे म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला लाभ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच सोयाबीन उत्पन्न वाढीस चालना मिळेल. शेतकऱ्याची उत्पादकता व निर्यातक्षम माल कसा वाढविता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यापुढे क्षेत्र आधारित रिसोर्स बँक तसेच कृषि विद्यापीठे व पाणी फाऊंडेशन यांच्याकडून नवीन तज्ज्ञ व्यक्तींची निवड करुन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ज्ञान कसे देता येईल, यावर भर राहणार आहे. शेतकरी बांधवाची प्रगती झाली पाहिजे हा शासनाचा मानस असून यासंदर्भात पूर्ण सहकार्य करण्यात येईल असेही, श्री. भुसे यांनी सांगितले.

डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवणे गरजेचे – आमीर खान

पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान म्हणाले,शेती जाणून घेण्यासाठी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या माध्यमातून खूप काही शिकण्याची संधी मिळाली. डिजिटल पद्धतीने ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. सोयाबीन शेतीच्या प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची टीम स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये डॉ.मिलिंद देशमुख, डॉ.अनित दुर्गुडे, डॉ.नाद्रा भुते आणि सचिन महाजन. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. जाधव आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील आर.एस.डॉ. राजीव पावरेड आहेत. राहुरी विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राचीही मदत झाल्याचे पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान यांनी सांगितले.

श्री. पोपटराव पवार म्हणाले, मशागतीपासून कापणीपर्यंतचे तंत्रज्ञान अवगत करुन कापणीपासून ते बाजारपेठेपर्यंत कसे नेता येईल, यासाठी कार्यशाळेचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्लॅटफार्मच्या माध्यमातून विविध योजनांचे व्हिडीओ तयार करुन  शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या भाषेत संबंधित विषय त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीसंदर्भात महाराष्ट्र शासन आणि पाणी फाऊंडेशनने मिळून काम केल्यास महाराष्ट्र देशात अग्रेसर असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कृषि विभागाचे प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले, पाणी फाऊंडेशनने समृद्ध गाव योजनेत खूप चांगले काम केले आहे. या माध्यमातून या योजनेस राष्ट्रव्यापी स्वरुप देऊन यापुढे पीकांसंदर्भातही अन्य काम करु. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग वाढेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/9HmVgnt
https://ift.tt/rit4jDP

No comments:

Post a Comment