हर्सूल ते फर्दापूर राष्ट्रीय महामार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे
-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
· रस्त्यातील खड्डे तात्काळ दुरूस्त करावेत
· घाटातील संरक्षण भिंतीचे काम मे पर्यंत पूर्ण करावे
· हर्सूल रस्त्याच्या मुल्यांकनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी
ओैरंगाबाद दि. 06 (जिमाका) : पर्यटनाच्या दृष्टीकोनातून औरंगाबाद ते फर्दापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ हा अत्यंत महत्वाचा आहे. ह्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पर्यटन वाढून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याने या मार्गातील मोठे पूल वगळता इतर कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज हर्सुल ते फर्दापूर ह्या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसिलदार श्री राजपुत, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ओंकार चांडक, उप अभियंता अभिजित घोडेकर, कनिष्ठ अभियंता कल्याणी पाटील तसेच संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद ते फर्दापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ हा अत्यंत महत्वाचा आहे. ह्या रस्त्याचे काम अधिक वेगाने करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन प्रवास सुरक्षित होईल हे पहावे. काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यांवर पाणी टिकून राहण्यासाठी ओले पोते टाकण्यात आले आहेत त्या ऐवजी वाफे करावेत जेणेकरुन रस्त्याला सम प्रमाणात पाणी मिळेल आणि रस्त्याचा दर्जा सुधारेल. सिल्लोड जवळील भवन येथील सिध्देश्वर विद्यालय परिसरात मेडियनची रुंदी कमी करुन 1.50 मीटर करता येईल का हे तपासावे. ह्या परिसरा व्यतिरिक्त मेडियनची रुंदी 2.50 मीटर एवढी ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
अजिंठा गावाजवळ राजेंद्र जयस्वाल यांनी रस्त्याचे काम थांबविले असल्याने ह्या प्रकरणाची तपासणी करावी. रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कारवाई करावी. गोळेगांव येथील नाल्याचा नैसर्गिक प्रवाह गांव नकाशावरून तपासावा तसेच अजिंठा गावालगतच्या मुळ रस्त्यांची तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संजय मोरे आणि तहसिलदार श्री राजपुत यांना दिले.
अजिंठा घाटातील सुरू असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामांची पाहणी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. सदरील काम हे वन विभागाच्या जागेवर नसून फेनशिंगच्या आत सूरू आहे. हे काम मार्च महिना अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित ठेकेदारांना दिले.
भुसंपादनाविषयी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, हर्सूल येथील रस्त्याच्या मुल्यांकनाचे काम गतीने पूर्ण करुन ही प्रक्रिया 10 तारखेपर्यंत संपविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांना दिले. तसेच सिल्लोड ते फर्दापूर राष्ट्रीय महामार्गातील भुसंपादन देखील त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांना यावेळी दिले.
No comments:
Post a Comment