मुंबई, दि. 2 : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी सायबर साक्षर असणे काळाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची सतर्कता महत्त्वाची आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन नवीन महिला धोरण तयार करण्यात येणार असून महिला धोरणात महिलाविषयक कायदे व त्याची अंमलबजावणी याच्या जनजागृतीवर भर देणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
सुधारित महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस महासंचालक, सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, सहसचिव श.ल.अहिरे, अवर सचिव महेश वरुडकर उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला धोरणाबाबत विभागामध्ये बैठका घेत असून त्याच्या अंमलबजावणी तसेच त्यामध्ये अधिक कोणत्या बाबी समाविष्ट करणे आवश्यक आहे याविषयी विचारविनिमय, चर्चा करीत आहोत. या धोरणाचा प्रारूप मसुदा पाठविण्यात आला असून याबाबत आपले अभिप्राय व सूचना तात्काळ कळवाव्यात.
नकळत, वाट चुकून गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या बालकांचे संनियंत्रण व त्यांची देखरेख करणे सोपे व्हावे यासाठी ‘ज्युवेनाईल जस्टीस इन्फर्मेशन सिस्टीम’ ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर सर्वांनी अद्ययावत माहिती द्यावी. त्यामुळे बालकांची काळजी घेण्याऱ्या संस्था, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ (जेजेबी) यांचे संनियंत्रण आणि प्रत्येक बालकाची नोंद व पाठपुरावा करणे सुलभ होणार आहे, असे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/e2DTrpnv0
https://ift.tt/zXK9m6AEV
No comments:
Post a Comment