नगर : ‘बिग मी इंडिया’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक - latur saptrang

Breaking

Saturday, February 19, 2022

नगर : ‘बिग मी इंडिया’च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक



 नगर : ‘फंड पे’ डिजिटल मोबाईल वॉलेट तयार करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत ‘बिग मी इंडिया’ कंपनीच्या माध्यमातून राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सोमनाथ एकनाथ राऊत (वय 42, रा. पाथरवाला, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यास नगर पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कागल येथील सतीश बाबुराव खोडवे यांच्यासह तब्बल 61 गुंतवणूकदारांना 7 कोटी 68 लाखांचा गंडा घातल्याची फिर्याद नगर पोलिसांत दाखल झाली आहे. ‘बिग मी इंडिया’ कंपनीचे संचालक सोमनाथ एकनाथ राऊत व सोनिया एकनाथ राऊत यांच्याविरुद्ध नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राज्यभरातील सुमारे दीड हजार गुंतवणूकदारांची तब्बल 50 कोटींपर्यंत फसवणूक या दोघांनी केल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती

राऊत याने 2016 मध्ये नगर शहरात कुकाणा अर्बन मल्टिस्टेट निधी लिमिटेड कंपनी सुरू केली होती. त्याच ठिकाणी 2019 साली ‘फंड पे’चे कार्यालय सुरू केले. पुणे येथील श्री गणेश अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, पुणे या पत्त्यावर त्याने याची रजिस्टर नोंद केली. राऊत याने ‘बिग मी इंडिया’ या कंपनींतर्गत ‘फंड पे’ नावाचे डिजिटल वॉलेट सुरू करून वेगवेगळ्या पतसंस्था, एजन्सी तसेच बँकिंग सर्व्हिस पॉईंटच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पैसे भरणे व काढणे, त्याचप्रमाणे मोबाईल फोन, डिजिटल रिचार्ज अशा ऑनलाईन सेवा देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले.

पहिली तक्रार कागलमधून

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सतीश खोडवे यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यांना परतावाही मिळण्यास सुरुवात झाली होती. नंतर तो बंद झाला. त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा फोन बंद आला. खोडवे यांनी नगर येथे येऊन माहिती घेतली असता, त्यांना कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे समोर आले. तसेच राऊत दाम्पत्य गायब झाल्याचे व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनंतर इतर गुंतवणूकदारांनीही तक्रारी देण्यास सुरुवात केली.

No comments:

Post a Comment