सुधीर जोशी यांच्या निधनाने एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व गमावले- मंत्री छगन भुजबळ
नाशिक,(यूसुफ पठान) :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मुंबईचे माजी महापौर आणि माजी मंत्री सुधीर जोशी यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व गमावल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
शोकसंदेशात छगन भुजबळ म्हणतात, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी असलेल्या सुधीर जोशी यांच्या निधनामुळे एक अत्यंत मितभाषी शांत आणि सुस्वभावी असे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिलेली आहे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्षबांधणीसाठी सुधीर जोशी यांचे मोठे योगदान होते.त्यांनी मुंबई शहराचे महापौर तसेच युतीसरकारच्या काळात शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.महसूलमंत्री असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागले.
मुंबईतील मोठमोठ्या कंपन्या आणि बँकांमध्ये मराठी तरूणांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी स्थानिक लोकाधिकार समिती निर्माण करण्यात आली होती. ही स्थानिक लोकाधिकार समिती मोठी करण्यामध्ये त्यांचे योगदान होते.सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने आणि शिवसेनेने एक चांगला नेता गमावला आहे.
सुधीर जोशी यांच्या निधनाने जोशी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment