मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील अधीश या बंगल्याची मुंबई महानगरपालिकेकडून सोमवारी कारवाई होण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच महापालिकेच्या आठ अधिकाऱ्यांचे पथक नारायण राणे यांच्या बंगल्याच्या दिशेने रवाना झाले. नारायण राणे यांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वीच हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गेले होते. याठिकाणी या पथकाकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली. त्यामुळे महानगरपालिकेचे पथक आज नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई करणार का, हे पाहावे लागेल. गेल्यावेळी पालिकेचे अधिकारी राणे यांच्या अधीश बंगल्यावर आले होते. परंतु, त्यावेळी कोणीही बंगल्यात नसल्याने पालिकेचे अधिकारी नोटीस चिकवटून परतले होते. मात्र, आज पालिकेचे अधिकारी पूर्ण तयारी करून आल्याची चर्चा आहे. याठिकाणी पालिका अधिकाऱ्यांकडून अनधिकृत बांधकामाबाबत तपासणी आणि मोजमाप होण्याची शक्यता आहे. सध्या नारायण राणे स्वत: जुहूतील बंगल्यावर आहेत. त्यामुळे पालिकेच्या पथकाने कारवाई केल्यास नारायण राणे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. (Narayan Rane Bunglow In Juhu)
Live Updates:
* महापालिकेचं पथक त्यांच्या पद्धतीने काम करणार: महापौर किशोरी पेडणेकर
* बंगल्याचा ले-आऊट स्वत:सोबत ठेवण्याची महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नारायण राणे यांना सूचना
* के-वेस्ट वॉर्ड अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापालिका पथकाची पाहणी
* महापालिका अधिकाऱ्यांकडून बंगल्याच्या पाहणीला सुरुवात
* एफएसआय नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
* महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं पथक नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावर दाखल
* मुंबई महानगरपालिकेचं पथक पोलीस संरक्षणात नारायण राणे यांच्या बंगल्याच्या दिशेने रवाना
* नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली
* पालिकेचे अधिकारी बंगल्याचा पाहणी आणि मोजणी करणार
* महानगरपालिकेच्या पथकात आठ अधिकाऱ्यांचा समावेश
* थोड्याचवेळात महानगरपालिकेचे पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर पोहोचणार
* महापालिकेचे पथक पोलीस संरक्षणासाठी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात
शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या युद्धातील प्रमुख शिलेदार नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कोकणातील निलरत्न या बंगल्यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे हा आदेश राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून आला आहे. मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा निलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता नारायण राणे यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
No comments:
Post a Comment