मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यावेळी नवाब मलिक यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यांनी हात उंचावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळीच ट्विट करून आपण झुकणार नाही, असे संकेत दिले होते. त्यामुळेच नवाब मलिक यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आपण पुढच्या लढाईसाठी तयार असल्याचे दाखवून दिले. यानंतर नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. 'लढेंगे और जितेंगे', असे त्यांनी म्हटले.
वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर थोड्याचवेळात नवाब मलिक यांना मुंबई सेशन्स कोर्टात हजर केले जाईल. याठिकाणी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल. त्यामुळे ईडी नवाब मलिक यांच्या किती दिवसांच्या कोठडीची मागणी करणार, हे आता पाहावे लागेल.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. सकाळी पावणेआठच्या सुमारास त्यांची चौकशी सुरु झाली होती. त्यानंतर तब्बल सात तास नवाब मलिकांची चौकशी करण्यात आली.
आता नंबर अनिल परब यांचा असेल, किरीट सोमय्या
अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक आणि तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment