Raj Thackeray:मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; कार्यक्रमस्थळी उभारलेला स्टेज कोसळला
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील पक्षाच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोरेगावच्या शाखा क्रमांक ४० च्या उद्घाटन समारंभासाठी एक व्यासपीठ उभारण्यात आले होते. राज ठाकरे आल्यामुळे याठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी अनेक कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जवळ राहण्यासाठी व्यासपीठावर चढले होते. व्यासपीठावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने व्यासपीठाचा एक भाग अचानक कोसळला. त्यामुळे काही महिला व्यासपीठावरून खाली कोसळल्या. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना तातडीने बाहेर काढले. सुदैवाने या महिलांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या कार्यक्रमावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले. मनसेच्या शाखेत समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. ही आपल्यावरची मोठी जबाबदारी आहे. शाखा या राजकीय दुकानं होता कामा नये, तर या शाखा न्यायालय झाल्या पाहिजे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. (MNS chief Raj Thackeray at Goregaon Mumbai)
यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंती ही तिथीने साजरी का व्हावी, यामागील कारण स्पष्ट केले. आज महाराष्ट्रात तारखेनुसार शिवजयंती साजरी होतेय, ही चांगली गोष्ट आहे. पण तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला महाराष्ट्रात यापेक्षा मोठा उत्सव साजरा झाला पाहिजे. आपल्या हिंदू संस्कृतीत दिवाळी, गणेशोत्सव यासारखे सण तिथीनुसार साजरे होतात. त्यामुळे प्रत्येकवर्षी ठराविक तारखेला हे सण येत नाहीत. शिवजयंती हा देखील महाराष्ट्रातील जनतेसाठी उत्सव आहे. त्यामुळे शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले
तत्पूर्वी राज ठाकरे यांनी कुर्ला परिसरातील साकीनाका भागातील मनसेच्या शाखेचेही उद्घाटन केले. यावेळीही राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने पूर्ण ताकदीने रिंगणात उतरायचे ठरवले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे मुंबईत फिरून मनसैनिकांचा हुरूप वाढवताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment