Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये समेट होणार? युद्धाची झळ बसल्यावर चर्चेची तयारी - latur saptrang

Breaking

Friday, February 25, 2022

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये समेट होणार? युद्धाची झळ बसल्यावर चर्चेची तयारी

 कीव्ह / मॉस्को :


युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचा दावा रशियाच्या सरकारी मीडियाकडून करण्यात आला आहे. तसंच रशियाकडून युक्रेनशी चर्चेची तयारी देखील दर्शवण्यात आलीय.

रशियाशी चर्चेची तयारी, पण सुरक्षिततेची हमी हवी : युक्रेन

शुक्रवारी, रशियन सैन्य दारात पोहचल्यानंतर युक्रेनकडून रशियाशी चर्चेची तयारी दर्शवण्यात आली. 'कीव्हच्या तटस्थतेवर आम्ही रशियाशी चर्चा करण्यास तयार आहोत, परंतु, सुरक्षेची हमी मिळावी', असं म्हणत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक युक्रेनची भूमिका मांडली.
युक्रेननं हत्यार टाकावं, आम्ही चर्चेसाठी तयार : रशिया


यानंतर, 'आम्ही युक्रेनशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मात्र आधी युक्रेनच्या लष्कराला युद्ध थांबवावं लागेल', असं म्हणत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लेवरोव्ह यांनीदेखील नरमाईची भूमिका स्वीकारलीय. 'युक्रेनवर 'नव-नाझीं'चं राज्य असावं अशी रशियाचीदेखील इच्छा नसल्याचं' सर्गेई यांनी म्हटलं.


रशिया - युक्रेनला युद्धाची झळ

आतापर्यंत युक्रेन सेनेचे १८ टँक, ७ रॉकेट सिस्टम आणि ४१ मोटार वाहन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलाय. सोबतच १५० हून अधिक युक्रेनियन सैनिकांनी हत्यारं खाली टाकत रशियन सैन्यासमोर शरणागती पत्करल्याचंही रशियानं म्हटलंय.

तर दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये १३७ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक जण जखमी झालेत. युक्रेननं केलेल्या दाव्यानुसार, प्रत्यूत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात रशियाचे ८०० सैनिक मारले गेलेत. तसंच रशियाचे ३० टँक आणि १३ विमान - हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केल्याचंही युक्रेननं म्हटलंय.

रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला घातक हत्यारं तैनात करण्यासाठी अमेरिकेनं ६०० मिलियन डॉलर मदत उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय.

No comments:

Post a Comment