लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सेवा पुरविणारी देशातली पहिली महापालिका ठरली ; लातूर सर्व आघाड्यावर पुढे राहिल असे, प्रयत्न करु या - पालकमंत्री अमित देशमुख - latur saptrang

Breaking

Saturday, March 19, 2022

लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सेवा पुरविणारी देशातली पहिली महापालिका ठरली ; लातूर सर्व आघाड्यावर पुढे राहिल असे, प्रयत्न करु या - पालकमंत्री अमित देशमुख



 लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सेवा पुरविणारी देशातली पहिली महापालिका ठरली ; लातूर सर्व आघाड्यावर पुढे राहिल असे, प्रयत्न करु या

                                - पालकमंत्री अमित देशमुख

 

▪️ महिलांना स्मार्ट कार्ड दिले जाणार

▪️ सुरक्षित प्रवास, बस मध्ये असेल एक महिला कर्मचारी

▪️ महानगरपालिका हद्दीत सेवा पुरविली जाईल

 

लातूर, (जिमाका) दि.18:- लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सुविधा पुरविणारी देशातली पाहिली महानगरपालिका ठरली असून महिलांना अत्यंत सुरक्षित सेवा देणारी ही योजना अत्यंत यशस्वी होईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. लातूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्यावतीने या सेवेचा  शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

   यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्ष नेते दिपक सूळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमन मित्तल, माजी महापौर स्मिता खानापुरे, ज्येष्ठ नगर सेवक रविशंकर जाधव, महापालिका परिवहन  समितीचे सदस्य, इतर नगरसेवक उपस्थित होते.

  लातूर महानगरपालिकेच्यावतीने महिलांसाठी मोफत बस ही योजना अत्यंत योग्य काळात सुरु होत आहे. कोविडच्या एका पाठोपाठ एक अशा तीन लाटा आल्या. त्यामुळे पूर्ण क्षमतेनी कोणतीच गोष्ट करता आली नाही. आता मात्र, सर्व गोष्टी सुरळीत होत आहेत. त्यामुळे या बसचा महिलांना चांगला फायदा होईल. या बससाठी महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येईल, तसेच या बसमध्ये एक कर्मचारी महिला असेल. तसेच या बससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरीफिकेशन होईल. घरात आई आहे, वडील कामावर गेले, क्लास सोडायला कोणी नाही असे आता मुलीला वाटणार नाही. ती या बसमध्ये अत्यंत सुरक्षित प्रवास करेल, तिचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. हे शैक्षणिक नगरी आहे, इथे सुरक्षितता आहे म्हणून हजारो विद्यार्थी इथे शिकायला येतात या नावलौकिकात या बसचा आता समावेश होईल असे प्रतिपादन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

 

पर्यावरण पूरक बस

या बसेसमध्ये एक बस सी. एन. जी. वर, एक बस इथेनॉल वर आणि एक बस इलेक्ट्रिकल असावी असा प्रयत्न महानगरपालिकेकडून करावा. जेणेकरून या बस पूर्णपणे पर्यावरण पूरक होतील. वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी असे प्रयोग करावे लागतील. शहरातील सर्व ऑटो सीएनजीवर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता साखर कारखान्यातील ट्रॅक्टरही सीएनजीवर चालवणार आहोत. खासगी बससाठी खासगी तत्वावर टर्मिनल उभं करणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी काही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

असाही लातूर पॅटर्न…

ज्या वेळी सीईटी चा निकाल लागतो, त्यावेळी पहिल्या हजार दीड हजारात लातूरचे मुलं / मुली असतात. आता लातूर शहरातील क्लाससाठी स्वतंत्र हब उभं करण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी सर्व सोयीनीयुक्त असं हे हब असेल. जेणेकरून लातूर देशातले शैक्षणिक केंद्र बनेल. राजस्थानमधील कोटापेक्षा लातूरमध्ये अधिक शैक्षणिक गुणवत्तेची क्षमता आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करु या, लातूर मधल्या सर्व शैक्षणिक संस्थाच्या मागे प्रबळपणे उभं राहून हा विकास साधण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी केले.

 

लातूर महानगरातील नागरिकांसाठी हेल्थ कार्ड

लातूर महानगरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी प्रॉपर्टी टॅक्सला जोडून हेल्थ कार्ड सुरु करण्याचाही मनोदय पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी बोलून दाखविला.

   या वेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरासाठीच्या योजनांचा आढावा घेतला. महिलांसाठी मोफत बस सेवेबाबत महापालिका आयुक्त अमन मितल यांनी माहिती दिली. माजी महापौर स्मिता खानापूरकर, नगर सेवक रवीशंकर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment