मुंबई, दि. ४ : सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना अन्न व औषध प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांच्याकडे चाचणीसाठी प्राप्त होणाऱ्या सर्व औषध नमुन्यांच्या योग्य प्रकारे नोंदी ठेवून चाचणीअंती विहित नमुन्यात चाचणी अहवाल द्यावा आणि जे नमुने अप्रमाणित दर्जाचे आढळून येतील अशा नमुन्यांबाबत विना विलंब संबंधित परवाना प्राधिकारी, अन्न व औषध प्रशासन यांना कळविण्यात यावे. ज्या प्रयोगशाळेद्वारे या तरतुदीचे उल्लंघन केले जाईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सह आयुक्त तथा नियंत्रण प्राधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांनी कळविले आहे.
औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 च्या तरतुदीनुसार सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना औषध नियंत्रक, भारत सरकार यांच्या मान्यतेने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याद्वारा परवाने मंजूर करण्यात येतात. या परवानाधारक सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांनी चाचणीसाठी औषधे स्विकारणे, चाचणी करणे आणि चाचणीबाबत विहित नमुन्यात अहवाल देणे याबाबत या कायद्या अंतर्गत स्पष्ट तरतुदी आहेत. मात्र असे निदर्शनास आले आहे की, मे. इमेन्स कल्चर प्रा.लि., सिरीयल नं. 14 धाडगे इंडस्ट्रीयल इस्टेट, नांदेड, पुणे, या सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळा यांनी औषधांची चाचणी करुन ते अप्रमाणित आढळून येऊन सुद्धा चाचणीचा अहवाल कायदा व त्याअंतर्गत नियम 150-E (1) च्या तरतुदीनुसार विहित नमुन्यात दिलेला नाही. तसेच त्यांच्याद्वारा चाचणीअंती अप्रमाणित आढळून आलेल्या नमुन्याबाबत उक्त कायदा व त्याअंतर्गत नियम 150-E (g) च्या तरतुदीनुसार परवाना प्राधिकारी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांना कळविणे गरजेचे असूनसुद्धा परवाना प्राधिकारी यास कळविले नसल्याने या सार्वजनिक औषध प्रयोगशाळेवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/T6yiaGP
https://ift.tt/Myof9as
No comments:
Post a Comment