डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर - latur saptrang

Breaking

Wednesday, March 30, 2022

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

मुंबई, दि. 30 : औरंगाबाद शहरातील औषध विक्री दुकानात डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या बातम्यांची गंभीर दखल घेतली असून, त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत, असे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, काही व्यक्तींकडून नशेसाठी  Nitrosun (Nitrazepam Tablet) या झोपेच्या गोळ्यांची तसेच इतर औषधांची डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय खरेदी होत असल्याचे औरंगाबाद शहरात निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने सह आयुक्त (औषधे), औरंगाबाद विभाग यांना संबंधितावर कडक कारवाईचे आदेश दिले असून प्रशासनाने औषध विक्री दुकानांची तपासणी मोहीम राबवून ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून येतील त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करावे. तसेच पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून कडक कारवाई करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी दिल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 हा कायदा राबविला जातो. सदर कायद्यामधील तरतुदीनुसार डॉक्टरांच्या चिकित्सा चिठ्ठीशिवाय वर्गीकृत औषधांची विक्री करणे गुन्हा आहे.अशी विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित आस्थापनेचे परवाने कायमस्वरुपी रद्द होऊ शकतात. तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊ शकतात. औरंगाबाद विभागात एप्रिल, 2021 पासून मार्च 2022 पर्यंत एकूण सात प्रकरणात विना परवाना झोपेच्या गोळ्या/औषधे बाळगणे व विक्री करणे याकरिता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी यावेळी दिली.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/YOfo2Wp
https://ift.tt/yIjGWN6

No comments:

Post a Comment