शासनाच्या लोक कल्याणकारी योजना लोककला पथकाच्या माध्यमातून गावोगावी ; रेणापूर येथील रेणुकादेवी मार्केट मधून सुरुवात
रेणापूरच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या हस्ते उदघाट्न
लातूर दि. 9 ( जिमाका ) " गाव माझा, माझ्या गावात, कोण कोणत्या योजना " या ठेक्यावर शाहिर ताल धरतो आणि बतावणीत सांगतो, महिलांच्या विकास योजना, विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या योजना... ते लोकांच्या भाषेत लोक कलेच्या माध्यमातून सांगितल्यामुळे लोकांच्या पर्यंत पोहचतात हे आज रेणापूर मध्ये रेणुकादेवी मार्केट परिसरात दिसलें. परिवर्तन बहुद्देशीय सेवाभावी कला पथकाचे शाहिर धम्मपाल आपल्या पाहडी आवाजात सांगतात.. अशा या कलापथक कार्यक्रमाचे उदघाट्न रेणापूरच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी केले.
त्यावेळी रेणापूर नगर पंचायतचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे, रेणापूर व्यापारी संघटना अध्यक्ष रमाकांत वाघमारे, सदस्य राजकुमार काळे, सचिन मोटेगावकर, रेणुका देवी ट्रस्ट अध्यक्ष पाटील साहेब,नप नगरसेवक दत्ता सरवदे, नप कार्यालय अधीक्षक स्वामी, नप अभियंता विभूते यांच्या सह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अरे, संपत, संपत या हाकेनी गणपतरावचा प्रवेश होतो... संपतची भेट होते, गणपतराव संपतला घरची ख्याली खुशाली विचारतात,दोघांचा संवाद सुरु होतो, मग कोरोना काळात काय झालं, बऱ्याच लोकांना कोरोना झाला, अनेक जन सही सलामत यातून शासकीय दवाखान्यातील उपचाराने बाहेर पडले, काही जणांचा उपचारानेही ईलाज झाला नाही, ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या कुटुंबाला शासनाने 50 हजार रुपये दिले. अशा संवादाने अजून कोण कोणत्या योजना आहेत, त्या गाण्याच्या माध्यमातून ऐकू म्हटल्यावर शाहिर येतात, मग ते गितातून शिवभोजन थाळी, महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, अतिवृष्टीत झालेल्या पिकाची, जमिनीची नुकसान भरपाई... महिलांच्या कल्याणासाठी राखीव निधी.. विद्यार्थी, कास्तकार, दिव्यांगासाठीच्या योजना कार्यक्रम रंगात येतो.. लोकं तल्लीन होऊन ऐकतात.. रमाई आवास योजना, आवास योजना, पेय जल योजना सगळ्या योजना कधी गीत, कधी पोवाडा, कधी गवळन या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचतात...
आज पासून लातूर जिल्ह्यातील बाजारपेठा आणि मोठ्या गावात हा लोक जागर होईल... शासनाच्या योजना अत्यंत सोप्या भाषेत लोकगीतं, भारूड, गवळण, बतावणी या माध्यमातून पोहचतील.. हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्या उद्देशाला धरून जिल्हा माहिती कार्यालय, लातूर यांनी ह्या कला पथकाचा जागर 9 मार्च ते 17 मार्च पर्यंत मोठ्या गावात ठेवला आहे.
No comments:
Post a Comment