दणदणीत पराभवाचं होणार मंथन; सोनिया गांधींच्या नेतृत्वात आज काँग्रेसची बैठक
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव झाला आहे. एकाही राज्यामध्ये काँग्रेसला आपला करिश्मा दाखवता आलेला नाहीये. इतकंच नव्हे तर हातात असणारं पंजाब हे राज्य देखील काँग्रेसला गमवावं लागलं आहे. या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर चहुबाजूंनी काँग्रेसवर टीका आणि खिल्ली देखील उडवली जात आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने आतातरी भाकरी परतणे गरजेचं आहे, अशी म्हणत राहुल-प्रियांका आणि गांधी कुटुंबाच्या तावडीतून काँग्रेसचं नेतृत्व इतरांकडे देण्याची मागणी होत आहे. गांधी कुटुंबिय काँग्रेसचं नेतृत्व सोडत राजीनामा देणारा अशी माहिती काल प्रसारित झाली होती. मात्र, आता आज दुपारी चार वाजताा काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. दुसरीकडे जी-२३ गटानं देखील पक्षाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेतली आहे. गांधी कुटुंबिय राजीनामा देणार का? याबाबतचं अधिकृत स्पष्टीकरण आता काँग्रेसकडून आलं आहे.
पाच राज्यांमधील लाजीरवाण्या पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षातील पदांचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकलं होतं. त्यानंतर या चर्चेला अधिक जोर आला होता. या साऱ्या प्रकारानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर खुलासा करत ट्विट केलं आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी खुलासा करत म्हटलंय की, एका चॅनेलवर अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेलं वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक आहे. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारं वृत्त दाखवणं हे चुकीचं आहे. एखाद्या टीव्ही चॅनेलने सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून काल्पनिक स्रोतांच्या आधारे अशाप्रकारच्या अप्रमाणित प्रचारकी बातम्या प्रसारित करणे अयोग्य आहे, असं ट्वीट रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.
No comments:
Post a Comment