प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली - पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने - latur saptrang

Breaking

Thursday, March 3, 2022

प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली - पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने



 प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली - पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने 


  लातूर/प्रतिनिधी:प्रत्येक व्यवसायाचे एक तत्त्व असते. व्यवसाय करताना नीतीमुल्य जपली पाहिजेत.आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. प्रामाणिकपणा हीच यशाची गुरुकिल्ली आहे,असे मत पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.
   रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट व्यवसाय- सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ.लहाने बोलत होते. रोटरीचे माजी प्रांतपाल विजयभाऊ राठी यांच्यासह रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष सतीश कडेल यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
   यावेळी बोलताना पद्मश्री डॉ.लहाने म्हणाले की, व्यवसाय करताना समाजसेवेचे धोरण पत्करले तर हजारो लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात.
यातूनच आपले भाग्य बदलत असते.प्रत्येक व्यवसायाचे एक तत्त्व असते,नीतिमूल्य असतात.ते पाळले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
   विजयभाऊ राठी यांनी विविध कसोट्यांवर तपासुन पुरस्कारार्थ्यांची रोटरीने निवड केली असल्याचे सांगत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
    या कार्यक्रमात मनपाच्या कोविड अंत्यविधी पथकातील कर्मचारी, सामाजिक लघुउद्योग चालविणारे राजस्थानी महिला मंडळ,न्युरोसर्जन डॉ.हनुमंत किनीकर,प्राण्यांच्या उपचार व सेवेमध्ये नैपुण्य मिळवलेले डॉ.नेताजी शिंगटे,शासकीय रुग्णालयातील परिचारिका श्रीमती कल्पना गायकवाड, लातूर सॉल्व्हंटचे मालक शांतीलाल साबू,पद्मावती हार्डवेअरचे अशोक कोटे, सूर्या दक्षिण इडलीगृहाचे सूर्यकांत महाजन आदींचा शाल,स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
   प्रारंभी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष सतीश कडेल यांनी रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मन्मथ पंचाक्षरी,संचलन सचिन मालू व आभार प्रदर्शन व्होकेशनल सर्व्हिसेसचे डायरेक्टर चंद्रप्रभू जंगमे यांनी केले.
  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिनेश सोनी, विशाल अयाचित,मोतीलाल वर्मा,ओमप्रकाश झुरुळे, प्रकाश बियाणी,श्रद्धानंद अप्पशेट्टी,रवींद्र बनकर,सोनू डागवाले,डॉ.रवी रेड्डी, राजाराम दावणकर,उमाताई व्यास,श्रवण बियाणी शांतेश्वर येरटे,डॉ.श्रीनिवास भंडे, किशन कुलेरिया,अनिल कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment