मोठा निर्णय! शनिवारी, रविवारीही आता पूर्णवेळ भरणार शाळा
सोलापूर : जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक शाळा आता एप्रिलअखेरपर्यंत शनिवारी व रविवारीही पूर्णवेळ भरणार आहेत. रविवारी शाळा भरविण्याचा निर्णय मात्र ऐच्छिक असेल, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आहेत.
पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांच्या पत्रानुसार सोलापूर जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा (जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक शाळा) मार्च ते एप्रिल या दोन महिन्यात पूर्णवेळ शाळा भरविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन निघावे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी कायम टिकून राहावी, या हेतूने हे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेता न आलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्यासंदर्भात 'सकाळ'ने सातत्याने प्रकाशझोत टाकला होता. त्यानुसार आता शनिवारीही शाळा पूर्णवेळ भरविली जाणार आहे. रविवारी मात्र शाळा पूर्णवेळ भरविण्यासंदर्भातील निर्णय संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, महापालिका, नगरपालिकांचे प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापकांना तसे आदेश देण्यात आले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची 100 टक्के उपस्थिती असावी, शिक्षकांचीही उपस्थिती 100 टक्के बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रिडा विभागाच्या सहसचिवांच्या पत्राचाही संदर्भ या आदेशाला देण्यात आला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी उद्यापासून (सोमवार) केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची सर्वांगिण प्रगती हाच या आदेशामागील हेतू आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सक्त सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यासंबंधीची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. दरआठवड्याला शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
No comments:
Post a Comment