नवाब मलिक यांच्या खात्यांचा पदभार काढून घेण्यात येणार : जयंत पाटील
मुंबई :
मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होत आहे. दरम्यान आज (दि. १७) राष्ट्रवादी काँग्रेसची या मुद्द्यावरून बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी घेण्यात आलेल्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले.
दरम्यान, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे देण्यात येणार असून मलिकांकडे जी पालकमंत्रीपद आहेत तीही काढून घेण्यात येणार आहे. नवाब मलिक सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथील पक्षाच्या बैठक झाली. यावेळी मलिकांकडील मुंबईचे अध्यक्षपद आणि पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment