विधानपरिषद इतर कामकाज - latur saptrang

Breaking

Friday, March 25, 2022

विधानपरिषद इतर कामकाज

सीमाप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कर्नाटक सरकारचा विधान परिषदेत निषेध

 

मुंबई, दि. 25 : सीमाप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल कर्नाटक सरकारचा आज विधान परिषदेत निषेध करण्यात आला.

कर्नाटक-बेळगाव सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक सरकारने सोलापूर आणि अक्कलकोट बदल्यात बेळगाव कर्नाटकला मिळाल्याने सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही, असे वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या विधानामुळे मराठी भाषिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून त्याबाबत विधान परिषद सदस्य दिवाकर रावते यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून निषेध नोंदवला होता. यावर सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन कर्नाटक सरकारचा विधानपरिषदेत एकमताने निषेध नोंदविण्यात आला.

०००

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे ही शासनाची प्रामाणिक भूमिका  विजय वडेट्टीवार

 

मुंबई, दि. 25 :- मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जयंत बांटीया आयोग नेमण्यात आला आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी मातब्बर वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरक्षण टिकण्यासाठी शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. हा आयोग टिकेल असा विश्वास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत व्यक्त केला.

नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा सदस्य विनायक मेटे यांनी उपस्थित केली होती यावर उत्तर देताना मंत्री श्री. वडेट्टीवार बोलत होते. या चर्चेत नीलय नाईक, प्रसाद लाड, महादेव जानकर, सुरेश धस, अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला होता.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, जयंत बांटीया आयोग नेमताना सर्वंकक्ष चौकशी करुन आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तेव्हा जो कालावधी दिला होता तो 15 दिवसाचा होता. इतर मागास आयोगाकडून हा अहवाल मागवावा लागला. कमी कालावधीत अहवाल सादर केला असल्याने शेवटी न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. हा आयोग सर्व तज्ज्ञांचा विचार घेऊन नेमण्यात आला आहे.  यासाठी विरोधी पक्षांचाही विचार घेण्यात आला आहे.  आयोगावर काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी 25 कोटी निधीची तरतुद करण्यात आली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कायद्याच्या चौकटीत राहून आयोगाने आपले काम करावे.  जो आयोग नेमला आहे तो सर्वोच्च न्यायालयात टिकेल. यासाठी सर्वांने मिळून प्रयत्न करुया, असेही श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/CpBOYsb
https://ift.tt/TFPDefi

No comments:

Post a Comment