'रुमण्याचा मानकरी' काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न -मंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.२० मार्च :- बदलत्या काळानुसार कृषी संस्कृतीतल्या जुन्या स्मृती त्यांनी विस्मृतीत न टाकता त्यांना उजाळा दिला आहे. विविध विषयाची मांडणी करणारा हा काव्य संग्रह ग्रामीण जीवनाच्या चरित्राचा भाग वाखाणण्याजोगा आहे. रुमण्याचा मानकरी काव्य संग्रहातून ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मु.श.औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे कवी जी.पी.खैरनार लिखित 'रुमण्याचा मानकरी' या काव्य संग्रहाचे प्रकाशन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकाशक विलास पोतदार,प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, पोपटराव खैरनार,जिजाबाई खैरनार,सुनीता खैरनार,पांडुरंग खैरनार, मकरंद सोनवणे, पुस्तकाचे लेखक जी.पी.खैरनार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले जी.पी.खैरनार यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सद्या ते जिल्हा परिषद नाशिक येथे औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत आहे. जिल्हा परिषदेत आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांनी आपली वाचन आणि लेखनाची आवड जोपासली असून त्यांचा 'रुमण्याचा मानकरी' हा तिसरा कविता संग्रह आज प्रकाशित होत आहे.आज प्रकाशित होणारे त्यांचे तिसरे काव्य संग्रह व पाचवे पुस्तक आहे.शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ग्रामीण जीवन तेथील घटना, निसर्ग, शेतीपूरक व्यवसाय, गाय, बैल, म्हैस पाळीव प्राणी यांच्यावर आधारित वास्तव कवितांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, रुमण्याचा मानकरी हा त्यांचा ५२ कवितांचा तिसरा काव्यसंग्रह असून यामध्ये कृषी, कोरोना, मायबाप, मूल्य संस्कृती, सणोत्सव, व्यक्तीचित्रण, कुटुंब, प्राणी पक्षी आदी संबंधीच्या कवितांचा समावेश आहे. या कविता संग्रहातील ५२ कवितांची शब्दकळा साधी, सोपी आणि सुगम आहे. कवितांची मांडणी अगदी सहज सोप्या भाषेत केल्याने त्या वाचनीय ठरतात. फुले दाम्पत्य, अनाथांची माय यासह लिहिलेल्या विविध कविता समाजाच्या परिवर्तनास उपयोगी ठरतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, नाशिकला कला क्रीडा क्षेत्रात अतिशय मोठी परंपरा लाभली आहे. वसंत कानेटकर या भूमीतुन पुढे आले त्यांचे साहित्य नाटकं अतिशय लोकप्रिय ठरली. काशिनाथ घाणेकर यांनी भूमिका केलेलं हे नाटकं बघण्याच भाग्य मला लाभलं असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी लेखक जी.पी.खैरनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment