देशभरात विविध राज्यांमध्ये अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात असल्याच्या घटना घडत असतानाच रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक गंभीर विधान केलं आहे. या घटनांचा भारतीय कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे. यामुळे भारतीय उत्पादनांची बाजारपेठ कमी होईल आणि भारतावरचा परदेशी सरकारांचा विश्वास उडेल असं राजन यांनी सांगितलं आहे.
दिल्लीतल्या जहाँगीरपुरी या भागातल्या मशिदीच्या आसपासची दुकानं, घरं बुल्डोझरच्या साहाय्याने पाडण्यात आली. सांप्रदायिक हिंसाचाराची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांच्या या विधानाने लक्ष वेधलं आहे. टाईम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना राजन म्हणाले, जर आपल्याकडे सर्व नागरिकांना तसंच गरीब राष्ट्रांनाही समान वागणूक देणारं लोकशाही राष्ट्र म्हणून पाहिलं गेलं, तर आपण अधिक सहानुभुतीशील ठरू. ग्राहक म्हणतील की हे राष्ट्र काहीतरी चांगलं करायचं प्रयत्न करतंय त्यामुळे मी या राष्ट्राकडून वस्तू खऱेदी करेन.
राजन पुढे म्हणाले,"फक्त ग्राहकच अशा पद्धतीने विचार करत नाहीत की कोणाला आपण पाठिंबा द्यायचा. पण आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलही अशा दृष्टिकोनातून विचार होतो. एखादा देश अल्पसंख्यांकांना कशी वागणूक देतो यावर हा देश विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही, याबद्दल सरकारे विचार करतात आणि निर्णय़ घेतात. "
No comments:
Post a Comment