सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू आजारपणातून बाहेर पडताच मंत्रालयात दाखल - latur saptrang

Breaking

Monday, April 18, 2022

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू आजारपणातून बाहेर पडताच मंत्रालयात दाखल

मुंबई, दि. 18 : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा मंत्रालयात कामकाजाला सुरुवात केली आहे.

मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात 4 दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, दोन दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर आज सोमवारपासून त्यांनी पुन्हा आपल्या कामकाजास सुरुवात केली.

श्री. मुंडे मंत्रालयात आले त्यांनी विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपसचिव दिनेश डिंगळे,  खाजगी सचिव डॉ. प्रशांत भामरे यांच्यासमवेत विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली.

मंत्रालयातील टपाल, महत्त्वाच्या नस्ती यावर त्यांनी सह्या केल्या तसेच भेटावयास आलेल्या अभ्यागतांच्या भेटी घेतल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी आजारी असताना रुग्णालयातून धनंजय मुंडे सातत्याने अधिकाऱ्यांना सूचना देत होते. कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे यासाठीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून डॉक्टरांना विनंती केली होती; मात्र संबंधित डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली नव्हती.

दरम्यान आज श्री.मुंडे यांनी पुन्हा कामकाजास सुरुवात केल्याने विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/sSo69ux
https://ift.tt/loTLRf5

No comments:

Post a Comment