छत्रपतींच्या वारसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकार पक्षाने १४ दिवसांची पोलीस कोठडी मागत विविध मुद्द्यांचा तपास करायचा असल्याचे सांगितले. यावेळी तपास अधिकारी आणि सरकार पक्षाचे दोन वकील असे तिघेजण बोलले. सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने सर्व मुद्दे खोडून काढण्यात आले आणि पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. युक्तिवाद सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये दोनदा खडाजंगी झाली. खा. उदयनराजे यांचा पराभव का झाला? असा मुद्दा बचाव पक्षाने मांडताच सरकार पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. यावर बचाव पक्षाने हे वक्तव्य मागे घेत सपशेल माफी मागितली. माफीनाम्यानंतर सरकार पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.
सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर आज सातारा न्यायालयात हजर केले. या पार्श्वभुमीवर शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ऑक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षण प्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबतच्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी काल (गुरुवार) मुंबईतून ताब्यात घेतलं होते.
आज सातारा पोलिस त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सातारा पोलीस ठाण्यात गुरुवारी सदावर्ते यांना आणल्यानंतर काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली होती. आज कोर्टात सरकारी पक्ष व बचाव पक्ष यांचा जोरदार युक्तिवाद झाला. या पार्श्वभूमीवरआज पोलीस कोठडी व न्यायालय परिसरात सातारा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
No comments:
Post a Comment