मुंबई, दि. 19 : वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता आणि एकसमानता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एच.एम.आय.एस.) अभ्यास करण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
आज मंत्रालयात आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (एच.एम.आय.एस.)याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी एच.एम.आय.एस याबाबत सादरीकरण केले. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालयांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय माहिती निर्माण करणे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व शैक्षणिक बाबींमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे ही गरज आहे. त्यामुळेच येत्या काळात या विभागासाठी आवश्यक सॉप्टवेअरचे विश्लेषण, मॉड्युल्सची संख्या, वापर करण्याची सुलभता आणि एकसमानता या पर्यायांचा सांगोपांग विचार करुनच राज्यामध्ये सर्वंकष अशी एकच एच.एम.आय.एस. कार्यप्रणाली विकसित होणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही योजना 27 सप्टेंबर 2021 पासून संपूर्ण देशात कार्यान्वित केली आहे. या योजनेमध्ये आरोग्याशी संबंधित सर्व घटकांचा जसे, रुग्णालय, क्लिनिक्स, प्रयोगशाळा, फार्मसिज, रेडिओलॉजी सेंटर्स इत्यादीचा समावेश असणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे. एच.एम.आय.एस कार्यप्रणालीचा वापर करताना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील संस्थांमध्ये आवश्यक सॉप्टवेअर आणि हार्डवेअर, आवश्यक कुशल मनुष्यबळ यांची आवश्यकता असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सी-डॅक (C-DAC) यांच्याकडून रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचा प्रस्ताव मागितला असून याबाबतचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/cpMtk1S
https://ift.tt/zGUwjFR
No comments:
Post a Comment