मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात - latur saptrang

Breaking

Thursday, May 12, 2022

मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात

 




मान्सून अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात


सध्या असनी चक्रीवादळाचं संकट आहे. यामुळे सुमुद्रकिनारी असणाऱ्या प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे. दरम्यान, आता आयएमडीने आणखी एक ट्विट केलं आहे. येत्या चार आठवड्यांत देशातील अनेक प्रदेशांत पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील चार आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसणार असण्यची शक्यता आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मान्सून या आठवड्यातच अंदमान बेटावर दाखल होणार असून तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार आहे.

असनी वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने 10 ते 12 या कालावधीत पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात मासेमारीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. यासोबतच समुद्रातील मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा रस्ता खराब झाला असल्याने रस्त्यावरून जाणारी वाहतूक रोखून धरली आहे. समुद्री किनारी असणाऱ्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे.

हिंदी महासागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने असनी चक्रीवादळ आता बांग्लादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले असून १९ किमी प्रतीतास या वेगाने हे वारे वाहत आहेत. असनी चक्री वादळ आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये धडकेल्याने या राज्यांत मुसळधार पाऊसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

10 आणि 12 मे दरम्यान अरुणाचल प्रदेशात आणि 09-12 मे दरम्यान आसाम-मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्रात पूर्व मॉन्सून दाखल होईल त्यामुळे पहिल्या टप्प्यात दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता होती. मात्र या वादळामुळे मान्सुन पुढे जाणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे.

No comments:

Post a Comment