मुंबई, दि. 3 :- युद्ध व शस्त्रास्त्रे ही देशाची सच्ची शक्ती नसून संस्कृती हीच भारताची सौम्य संपदा आहे. संस्कृतीला आधारभूत मानून सर्जनशीलतेला चालना दिल्यास आपण अजरामर कृती तयार करू शकू असे सांगताना सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. ‘भारतीय सिनेमा व सौम्य संपदा’ या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे केले, त्यावेळी ते बोलत होते.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद व फ्लेम युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या चर्चासत्राला ज्येष्ठ चित्रपट निर्माते तसेच फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शेखर कपूर, माजी खासदार रूपा गांगुली, आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. दिशान कामदार, प्रसिद्ध निवेदक हरीश भिमानी व संयोजक विनोद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय सिनेमाच्या सौम्य संपदेमुळेच अनेक देशातील लोकांना भारतीय भाषा समजत असल्याचे सांगताना भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानामुळेच रामायण व महाभारत यांवर आधारित धारावाहिक सर्वाधिक चालल्या, असे राज्यपालांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण तसेच आज जगभर मान्यता पावलेला भारतीय योग देशाच्या सांस्कतिक संपदेचे द्योतक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असून ते चित्रपटांच्या माध्यमातून जगापुढे यावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
भारतीय कथानक जगभर पोहोचविण्यासाठी युवकांना तंत्र सक्षम करावे : शेखर कपूर
आज अमेरिकेतील 90 टक्के युवक सिनेमा किंवा इतर आभासी व्यासपीठांवरील निर्मिती पाहत नसून ते गेमिंग तसेच युट्युबवर निर्मित खासगी कथानक पाहत असल्याचे नमूद करून जगातील मोठा युवा देश असलेल्या भारताकरीता सध्याचा काळ ही आपले कथानक जगभर पोहोचविण्याची सुवर्ण संधी आहे, असे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. युवकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक असल्याचे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. भारताकडे जगाला सांगण्यासाठी फार मोठे कथानक असून त्याच्या प्रचार प्रसारासाठी आपण मार्ग शोधले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. विनय सहस्रबुद्धे तसेच डॉ. दिशान कामदार यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.
चर्चासत्रामध्ये सिनेमातील वसाहतवाद : पाश्चात्यांच्या नजरेतून जागतिक व भारतीय सिनेमा, भारताचा मूलभूत विचार आणि चित्रपटाचे माध्यम, भारतीय सिने संगीतावर जागतिक परिणाम व लता मंगेशकर यांची गाणी या विषयांवर सत्र होणार आहेत. चर्चासत्राचा समारोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/IvjBfLd
https://ift.tt/ZE9zcf4
No comments:
Post a Comment