महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दिला धार्मिक एकात्मतेचा संदेश धर्मगुरु, राजकीय नेते आणि पत्रकारांच्या उपस्थित ईद मिलन - latur saptrang

Breaking

Saturday, May 21, 2022

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दिला धार्मिक एकात्मतेचा संदेश धर्मगुरु, राजकीय नेते आणि पत्रकारांच्या उपस्थित ईद मिलन



 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दिला धार्मिक एकात्मतेचा संदेश


धर्मगुरु, राजकीय नेते आणि पत्रकारांच्या उपस्थित ईद मिलन

लातूर-प्रतिनिधी : देशात आणि राज्यात काही समाज घटकांकडून सामाजिक, धार्मिक वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला जात असून अशा विकृत मानसिकतेच्या विरोधात धर्मगुरू,राजकीय नेते आणि पत्रकारांनी एकत्र येऊन देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन लातुरात शुक्रवारी आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले.
       महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूरच्या वतीने येथील नाना-नानी पार्कच्या लॉन्सवर घेण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमात मान्यवरांनी उपरोक्त आव्हान केले.
       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍड. अण्णाराव पाटील तर विचारपीठावर धर्मगुरू भन्ते पय्यानंद, भन्ते संघरत्न,भन्ते पयदीप, फादर सुभाष रकटे, मौलाना मुक्ती ओवेज कासमी,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष व्यंकटराव बेद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, काँग्रेसचे नेते माजी उपनगराध्यक्ष मोहन माने,बसवंत आप्पा उबाळे, प्रसिद्ध व्यापारी ॲड. जहिरोद्दीन सय्यद,असदखान पठाण,एमआयएम चे नेते अफजल कुरेशी, तौफिक असलम खान, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे आदी उपस्थित होते.
     देशात धार्मिक ध्रुवीकरण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संघाने धार्मिक व सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून राजकीय व सामाजिक सद्य परिस्थिती अशी खुल्ली चर्चावर सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित तिन्ही धर्मगुरूंनी कोणताही धर्म एकमेकांच्या विरोधात उभे राहण्यास मान्यता देत नसून जगात मानवता हाच खरा धर्म असल्याचा उपदेश करताना अनेक दाखले दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले, शिवसेना कधीच जात धर्म मानत नाही, शिवसेनेने अनेक मुस्लिम नेते राज्याला दिले आहेत. त्यामुळे कोणीही कितीही एखाद्या मुद्यावरून धार्मिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासह शिवसैनिक छातीचा कोट करून धार्मिक वातावरण चांगले करण्यासाठी राज्यात सर्वात पुढे राहील,असे आश्वासन दिले.
     ऍड व्यंकट बेद्रे म्हणाले की, कोणी कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नाही त्यामुळे सगळ्यांनी कोणत्याही गोष्टीचे अवडंबर न माजवता देशाचे हित लक्षात घेऊन गुण्यागोविंदाने नांदण्याची गरज आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते ऍड अण्णाराव पाटील म्हणाले, देशात हिजाब व भोंगे अधिक कारणावरून धर्मा धर्मात तेढ निर्माण केला जात आहे अशा परिस्थितीत सर्वच धर्मियांनी सलोख्याची भूमिका घेण्याबरोबरच प्रशासन व न्यायपालिकेवरही मोठी जबाबदारी आली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, जहिरोद्दीन सय्यद, बसवंत आप्पा उबाळे अफजल कुरेशी यांचीही यथोचित भाषणे झाली.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर कारभारी,शहराध्यक्ष महादेव डोंबे, जिल्हा संघटक सुधाकर फुले, कोषाध्यक्ष अरुण कांबळे, इलेक्ट्रॉनिक प्रमुख हरुण मोमीन, कय्यूम शेख आदींनी परिश्रम घेतले. यावेळी जावेद शेख, मैनोदीन सय्यद, एन. ए.इनामदार, सालार शेख, सुशील वाघमारे, हरिश्चंद्र जाधव,बाबुराव शेळके, बाळकृष्ण धायगुडे,सतीश देशमुख,सुनील बसपुरे,उमेश ब्रिजवासी, सी.एन.तोंडचिर कर, युनुस पटेल, डॉ.सितम सोनवणे, नितीन चालक,प्रमोद मोकाशे, संतोष कदम, धनंजय शेळके, अजय कल्याणी, दीपक पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगून ईद मिलनचे महत्व सांगितले. सूत्रसंचालन व्यंकटेश नरसिंगे, विक्रांत शंके यांनी तर आभार महादेव डोंबे यांनी मानले. यावेळी उपस्थित सर्व मुस्लीम पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ व गमजा देऊन सत्कार करण्यात आला व शेवटी सिरखुमाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
चौकट-
पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक:-
राज्यभरातील पत्रकारांवरील अन्याया विरोधात लढणारी प्रमुख संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सर्वदूर ओळख आहे. पत्रकारांच्या समस्या बरोबरच पत्रकार संघाच्या वतीने अन्य मुद्द्यावरही आवाज उठवला जात तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, गरजूंना अन्य धान्य वाटप, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्याचबरोबर  देशातील धार्मिक सलोखा कायम राहावा म्हणून घेण्यात आलेला ईद मिलन उपक्रमाचे विविध धर्मगुरू व  मान्यवरांनानी कौतुक केले.

नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !


https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj

No comments:

Post a Comment