लातूर दि. 26 ( जिमाका, विशेष वृत्त ) – लातूर जिल्हा मराठवाड्यात वीज पडून दुर्घटना होण्यात दुसऱ्या स्थानी आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सहकार्याने अभ्यासगट स्थापन केला होता. त्या अभ्यासगटाचे सादरीकरण झाले असून अभ्यासगटाने सुचवलेल्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ करणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य होणार आहे.
मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषतः मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणतः माहे ऑक्टोबर या महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.
मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेष करुन ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यामध्ये विशेषतः शेतकरी व शेतमजुरांची संख्या अधिक आहे. अभ्यासगटाने केलेल्या सादरीकरणात जिल्ह्यात गेल्या चार वर्षात काही जणांचा आणि अनेक जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वीजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान शेतकऱ्यांना व नागरिकांना काही वेळ अगोदर समजावे, यासाठी सदर दामिनी ॲप उपयोगी ठरत आहे. पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संशोधन संस्था ( आयआयटीएम ) या संस्थेने हे ॲप विकसित केले आहे. ‘दामिनी’ ॲपसाठी आयआयटीएमने लाइटनिंग लोकेशन नेटवर्क हे मॉडेल विकसित केले आहे. माहिती संकलनासाठी विविध भागात सेन्सर बसविण्यात आले आहेत. या ॲपमुळे शेतकरी, नागरिकांना वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे पंधरा मिनिट ते अर्धा तास आधी अचूक अंदाज मिळू शकतो. सदरचे अॅप GPS लोकेशन ने काम करीत असून वीज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी सदरच्या ॲपमध्ये प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राची दिशादर्शक स्थिती दर्शविण्यात येते. वीजा पडण्याची शक्यता तसेच वीज म्हणजे नेमके काय, वीज कोसळणे याची शास्त्रीय माहिती आणि वीजांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे, याचीही सविस्तर सचित्र माहिती ‘दामिनी’ ॲपमध्ये देण्यात आली आहे. या ॲपवर लोकेशन टाकल्यानंतर संबंधित भागात वादळी वारे अथवा वीजांच्या गडगडांची शक्यता असल्यास ती माहिती बघायला मिळत असते, त्यामुळे या माहितीचा आधारावर शेतकरी व नागरिक वेळीच सावध होऊन त्यांच्या जीव वाचवू शकतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याबाबत, तसेच स्थानिक पातळीवर गावस्तरीय कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सामान्य नागरीक / शेतकरी यांना हे अॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा तर्फे करण्यात आले आहे.
दामिनी ॲप फोनमध्ये कसे घ्यावे?
गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ‘damini’ असं टाईप केल्यानंतर हे ॲप दिसेल. येईल ते आपल्या फोन मध्ये डाऊनलोड करून घ्या… ते आपल्या सुरक्षिततेसाठी मोठी भूमिका बजावू शकतं.. अधिक सतर्क राहण्यासाठी हे ॲप आपल्याकडे असाव… हा मोबाईल अॅप आजच डाऊनलोड करून घ्या…
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/PfECOto
https://ift.tt/A01hmBE
No comments:
Post a Comment