कला विद्यापीठासाठी सांघिक भावनेने काम करण्याची गरज – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत - latur saptrang

Breaking

Thursday, June 9, 2022

कला विद्यापीठासाठी सांघिक भावनेने काम करण्याची गरज – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 9 : सर ज.जी. कला महाविद्यालयाची ख्याती आणि आकर्षण इतर राज्यांना आहे. या महाविद्यालयाचे उपकेंद्र त्यांच्या राज्यात व्हावे अशी मागणी इतर राज्यांकडून होत असतांना महाविद्यालयाची ख्याती टिकवून ठेवण्याची आणि कलाकारांच्या कलाकृती जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. या महाविद्यालयाचे रुपांतर कला विद्यापीठात व्हावे यासाठी सांघिक भावनेने काम केले पाहिजे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सर ज. जी. कला महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कलाकार, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याला संबोधित करतांना मंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष उत्तम पाचर्णे, प्र. कला संचालक प्रा. विश्वनाथ साबळे, माजी अधिष्ठाता प्रा. विनोद मानकर, ज्येष्ठ चित्रकार प्रकाश, भिसे, विख्यात चित्रकार रवी मंडलिक, प्राचार्य फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल तांबे आदी संघटनांचे अध्यक्ष,अधिकारी- कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या कला महाविद्यालयाचे रूपांतर कला विद्यापीठात होण्यासंदर्भात अनेकांमध्ये गैरसमज, संभ्रम निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे हा गैरसमज आणि संभ्रम दूर होणे गरजेचे आहे. सर ज. जी. कला महाविद्यालयाचे रूपांतर कला विद्यापीठात व्हावे याचा सामोपचाराने निर्णय होणे गरजेचे आहे. राज्यात कला विद्यापीठ व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कलाप्रेमी असल्याने त्यांनीही कला विद्यापीठाबाबत सकारात्मक बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. कला शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे. चांगले विद्यार्थी घडविल्यास आपोआपच विद्यालयासह शासनाचेही कौतुक केले जाते. त्यामुळे या विद्यापीठाचा फायदा कोणाला होणार याचाही विचार करण्याची गरज आहे, लवकरच एकत्रित बैठक घेवून मार्ग काढला जाईल, असे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

प्राचार्य फेडरेशन, शिक्षक शिक्षकेतर संघटना आणि विनाअनुदानीत संघटनाच्या मागण्यांबाबत समन्वय समिती स्थापन करणे गरजेचे आहे. या समितीच्या माध्यमातून मागण्या मांडल्यास लवकरात लवकर मार्गी लागतील. चांगल्या कामांसाठी शासन नेहमीच सकारात्मक राहिले आहे. संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

कला संस्कृती जोपासण्यासाठी राज्य शासनाने कलासंचालनालयाला भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी अखर्चीत न ठेवता कालमर्यादेत खर्च करावा, अशा सूचना देखील श्री.सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

00000

पवन राठोड/उपसंपादक/9.6.22



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/SExztXY
https://ift.tt/JwZU5rb

No comments:

Post a Comment