वाशिम, दि. 9 (जिमाका) : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे पोहरादेवी हे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिर परिसरातील विविध विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 100 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या आराखड्यातील कामे यंत्रणांनी तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पालकमंत्री श्री.देसाई यांनी आज श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोल्याचे अधीक्षक दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे एका वर्षाच्या आत पूर्ण करावी. ही कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. सुधारित कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात यावे. या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता इमारतीच्या अंतर्गत सजावटीची कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावी. मंत्रालयस्तरावरुन पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
विकास आराखड्यातील 14 कोटी रुपयांची उर्वरित कामे त्वरीत सुरु करावी. असे सांगून श्री. देसाई म्हणाले, संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करुन ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावी. सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीवा राहणार नाहीत याबाबतची दक्षता घ्यावी. आराखड्यातील कामे करण्यासाठी मंजूर मर्यादित रकमेच्या अंतर्गत विविध बाबींसाठी जिल्हास्तरीय समितीने निधी खर्च करण्याचा निर्णय घ्यावा. निधी खर्च होताच उर्वरित निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे ते म्हणाले.
आमदार श्री. राठोड म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत कार्य करताना यंत्रणांनी कालमर्यादा निश्चित करुन कामे पूर्ण करावी. या आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या समितीला पूर्ण अधिकार देण्याबाबतचे प्रधान सचिव (वित्त विभाग) यांच्या स्वाक्षरीचे पत्र काढण्यात आल्याचे श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली. या सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीणा, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, सार्वजनिक बांधकाम (विद्युत)विभागाच्या कार्यकारी अभियंता नीता बोकडे व मानोरा तहसिलदार श्री. किर्दक यांची उपस्थिती होती.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ZsNu78v
https://ift.tt/7apBZWX
No comments:
Post a Comment