स्मारकाच्या पादपीठाचे काम पूर्णत्वाकडे; पुतळ्याची प्रतिकृती लवकरच अंतिम होणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे - latur saptrang

Breaking

Wednesday, June 15, 2022

स्मारकाच्या पादपीठाचे काम पूर्णत्वाकडे; पुतळ्याची प्रतिकृती लवकरच अंतिम होणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 15 : मुंबईतील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे सनियंत्रण व काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड आदी मान्यवरांनी आज इंदूमिल स्मारक कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे, त्याच्या पादपीठाचे काम आता पूर्णत्वाकडे आले असून, पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती देखील लवकरच अंतिम करण्यात येणार आहे, असे म्हणत मंत्री श्री. मुंडे यांनी एकूण कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याच्या प्रतिकृतीची निर्मिती सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांचे सहकारी करत आहेत. या प्रतिकृतीची मंत्रिमंडळाने नेमलेल्या उपसमितीने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन नुकतीच पाहणी केली होती व त्या प्रतिकृती मध्ये काही बदल सुचवले होते.

त्यानुसार नवीन बदलांसह शिल्पकार अनिल सुतार यांनी प्रतिकृतीबाबतचे सादरीकरण केले. ही प्रतिकृती लवकरच अंतिम करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेण्यात येईल, असेही माध्यमांशी बोलताना श्री. मुंडे म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, शिल्पकार अनिल राम सुतार, समीर अनिल सुतार, संजय पाटील, आर्किटेक्ट शशी प्रभू, इतिहासतज्ज्ञ डॉ. आर मालाणी, सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट चे प्रा. विश्वनाथ सहारे आदी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने त्याला पूरक असा दर्जा सांभाळून काटेकोरपणे यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, हे स्मारक भविष्यात जगभरात ओळखले जावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, विषयतज्ज्ञ, सर्व पक्षीय नेते यांसह विविध मान्यवरांच्या सूचना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

दरम्यान समुद्र किनाऱ्याचे वातावरण, वातावरणातील होणारे बदल, पावसाळ्यात कामाची गती आदी बाबी विचारात घेऊन दैनंदिन कामांचा तक्ता बनवून त्यावर अंमल करावा, अशा सूचना यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ/



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/E8tH0aS
https://ift.tt/E6jWmax

No comments:

Post a Comment