काळजी करू नका… लवकर बरे व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा - latur saptrang

Breaking

Thursday, July 7, 2022

काळजी करू नका… लवकर बरे व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

सांगली दि. 7 (जि.मा.का.) : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवारी 5 जुलै रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधून काळजी करू नका… लवकर बरे व्हा… अशा शब्दात दिलासा दिला. तसेच अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांना सर्व जखमी वारकऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात यावी. ‍मिरज सिव्हील येथील वैद्यकीय उपचारांव्यतिरीक्त अन्यत्र खाजगी ठिकाणी उपचारांची आवश्यकता असल्यास त्याचाही सर्व खर्च शासन करेल. जखमी वारकऱ्यांची मागणी असल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी हलविण्याबाबतही कार्यवाही करावी, असे निर्देशित केले.

यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने जखमी वारकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25 हजार रूपये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, तुमची तब्बेत कशी आहे, तुमच्या डॉक्टरांशी माझे बोलणे झाले आहे. आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ‍ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरज सिव्हील येथील जखमी वारकऱ्यांशी व्हीडीओ कॉलव्दारे संवाद साधला. यावेळी आमदार अनिल बाबर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे उपस्थित होते.

आमदार अनिल बाबर म्हणाले, वारकऱ्यांच्या दिंडीत वाहन घुसल्याने 17 वारकरी जखमी झाले. जखमी अवस्थेत वारकऱ्यांना या ठिकाणी आणल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने अत्यंत चांगली काळजी घेत उपचार केले आहेत. तीन लोक गंभीर होते. आज सर्वांची प्रकृती चांगली आहे. डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. रूपेश शिंदे यांनी वारकरी रूग्णांची विशेष काळजी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांच्याशी संवाद साधून आवश्यक निर्देश दिले आहेत. मिरज सिव्हील येथील व्यवस्थेव्यतीरिक्त अन्य व्यवस्था करावी लागल्यास त्याचाही खर्च सरकार करेल. पण रूग्णांना काही होवू नये याची सर्वतोपरी दक्षता घ्या, असे निर्देश देवून मुख्यमंत्र्यांनी स्वत: रूग्णांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. पांडुरंगाच्या आशीर्वादाने सर्व वारकरी रूग्ण लवकरात लवकर बरे होवून घरी जातील. शासकीय नियमाप्रमाणे मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असून तोपर्यंत तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रत्येक वारकरी रूग्णाला 25 हजार रूपये उपलब्ध करून देत असल्याचेही आमदार अनिल बाबर यांनी यावेळी सांगितले.
00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/iwLNU6e
https://ift.tt/2fn47Tj

No comments:

Post a Comment