मूळ शिवसेना कुणाची? विधी तज्ज्ञांच्या हवाल्याने अजित पवारांचं मोठं विधान
शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात असून उद्या (११ जुलै) यावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विधी तज्ज्ञ आणि प्रख्यात वकिलांच्या हवाल्याने म्हटलं की, “पक्षांतर बंदी कायदा आला तेव्हा त्यामध्ये कशाचा अंतर्भाव केला होता. त्याबाबत विधी तज्ज्ञ आणि प्रख्यात वकील आपापल्या परीने भूमिका मांडतात. या प्रकरणावर उद्याच्या ११ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काय निकाल लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हालाही तसंच वाटतंय किमान दिसताना तरी ते तसंच दिसतंय,” असं अजित पवार म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, “सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यानंतर दोन्ही बाजूने बोलणारे लोक असतात. हेही खरं आहे की, मी ज्या-ज्या वकिलांना विचारलं त्यातील बहुतेक वकिलांच्या मते, पक्षांतर बंदी कायद्याचं तंतोतंत पालन करायचं झाल्यास, १६ व्यक्तींबाबतचा निकाल वेगळा लागला पाहिजे,” असंही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment