सांसद आदर्श गाव योजनेला संधी समजून गावे स्वयंपूर्ण करा- डॉ. हेमंत वसेकर - latur saptrang

Breaking

Monday, July 25, 2022

सांसद आदर्श गाव योजनेला संधी समजून गावे स्वयंपूर्ण करा- डॉ. हेमंत वसेकर

नवी मुंबई, दि. 25 : महाराष्ट्रात स्वयंपूर्ण गावे करण्यासाठी ‘सांसद आदर्श गाव’ योजनेला संधी समजून राज्यातील सर्व नियोजन अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी राज्यस्तरीय संकल्प परिषदेत केले.

नवी मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी आणि राज्य कक्षासाठी ‘सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत’  राज्यस्तरीय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत हैद्राबाद येथील राष्ट्रीय ग्रामविकास संस्थानचे श्री. लखन सिंग यांची विशेष उपस्थिती होती. या परिषदेचे उद्घाटन  अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांच्या हस्ते करण्यात झाले.

उमेद अभियानाचे डॉ. हेमंत वसेकर यांनी उपस्थित सर्व अधिकारी यांना निवड केलेल्या सर्व गावांना आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक गाव किमान सर्व सुविधांनी युक्त आणि स्वयंपूर्ण होतील यासाठी निश्चित काम करता येईल. ग्रामस्थांचा लोकसहभाग मिळावा यासाठी संवाद उपक्रम सातत्याने आयोजित करणे आवश्यक आहे. गाव स्तरापासून ते जिल्ह्याचे खासदार यांचेसमोर आश्वासक आराखडा सादर करून त्याची अंमलबजावणीही होईल, याकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे कृतिशील नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात सर्वात पुढे असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. राऊत यांनी या योजनेतील गावांचे सूक्ष्म नियोजन करून सर्व योजनांचा समन्वय घडवून आणावा. निवडलेल्या गावांच्या ग्रामस्थांचे आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, पर्यावरण, स्वयंरोजगार, व्यवसायवृद्धी यांसारख्या विषयांना प्राधान्य देऊन काम करता येईल, असे निवेदन केले.

या संकल्प परिषदेचे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने करण्यात आले होते. अभियानाचे उपसंचालक डॉ.राजेश जोगदंड आणि यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी विशेष नियोजन केले. अभियान व्यवस्थापक विशाल जाधव यांनी या परिषदेचे सूत्र संचालन केले.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/qnrteVb
https://ift.tt/7vpf2l4

No comments:

Post a Comment