मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई, दि. 22 : संजय गांधी निराधार योजनेतून दिले जाणारे मानधन वेळेत दिले जाईल यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना मानधन देण्यात येते. पण कधी काही तांत्रिक अडचणीमुळे मानधन वेळेत देण्यात अडचणी येतात. पण या अडचणींवर मार्ग काढून मानधन वेळेत दिले जाण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल.
सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड यांनी या योजनेतून दिले जाणारे मानधन वाढवून देण्याबाबत शासन सकारात्मक असून ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरुन 60 वर्षे करण्यासाठी तातडीने बैठक घेऊ, असे सांगितले.
या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य सुनील कांबळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी सहभागी झाले होते.
००००
कर्नाळा बॅंकेतील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या गैरव्यवहारातील प्रत्येक संचालकांचा सहभागाबाबत तपासणी सुरू आहे. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. बँकेवर सध्या अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीधारकांना पैसे परत देण्यात आले आहेत. बॅंकेची स्थावर मालमत्ता आणि संचालक पदाधिकारी यांची स्थावर मालमत्ता, बॅंक खाती जप्त करण्याचे आदेश निर्गमित करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक यांचा प्रस्ताव गृह विभागास मिळाला आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित संशयितांविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
००००
उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला महिनाभरात मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारशींसह शासनाकडे प्राप्त झाला आहे. या प्रस्तावाला लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेऊन हा प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेअंतर्गत मांजरपाडा वळण योजना, धोंडाळपाडा, ननाशी, पायरवाडा पुणेगाव कालवा, दरसवाडी कालवा यांचा समावेश आहे. या प्रस्तावावर व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत चर्चा होऊन प्रस्ताव विहीत पद्धतीने मंत्री मंडळासमोर सादर करण्यात यावा, असा निर्णय झाला आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याबाबतही नुकतीच एक बैठक घेण्यात आली आहे. त्याबाबतचा जल आराखडा तयार करण्यात आलेला असून त्याची तांत्रिक व्यवहार्यता तपासणी करण्यात येत आहे. याबाबतचे काम कालबद्ध पद्धतीने करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याबाबतच्या चर्चेत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हरिभाऊ बागडे यांनी सहभाग घेतला.
००००
मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांत मुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यानंतर सात दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्यातील 35 तालुक्यातील 11 गावांचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात झाला आहे उर्वरित 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेस लवकरच मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यक असणाऱ्या सर्व मान्यता घेण्यात येतील.
सदस्य समाधान आवताडे याबाबतच्या चर्चेत सहभागी झाले.
००००
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका करण्याबाबत विचार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेच्या विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक खूप वाढली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली जाईल. या सिस्टीम मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल. यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॉलरची माहिती तत्काळ मिळेल. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येईल. या यंत्रणेत जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला जाईल. अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महामार्गावर झालेल्या अपघातामुळे झालेल्या आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मदत मिळण्यात काही उणिवा राहिल्या का हे तपासण्यासाठीही अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला.
००००
शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार – मदत व पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
शंखी गोगलगायी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊ. शेतीच्या नुकसानीबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शंखी गोगलगायीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्येही शंखी गोगलगायमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान नेमके किती झाले आहे. नुकसान भरपाई किती द्यावी लागेल यासाठी समिती स्थापन केली जाईल. समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
याबाबतच्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा आदी सहभागी झाले.
००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/B0kwmys
https://ift.tt/hMDbCe8
No comments:
Post a Comment