खेळाडूंना योग्य संधी मिळाल्यास स्थानिक मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - latur saptrang

Breaking

Wednesday, August 3, 2022

खेळाडूंना योग्य संधी मिळाल्यास स्थानिक मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि.२ : खेळांना प्राधान्य व खेळाडूंना योग्य संधी मिळवून दिली पाहिजे, आपल्या मुलांमधील क्रीडागुणांना वाव द्यायला हवा. असे झाल्यास स्थानिक पातळीवरील मैदानावरूनही जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होऊ शकतात, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने हांडेवाडी रोड, महम्मदवाडी येथे उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले,  हे शासन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे सरकार आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करू. राज्यातील अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच इतर भागात जाऊन पाहणी केली आहे. अतिवृष्टीमुळे जीवितहानी, वित्तहानीचा आढावा घेतला असून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. विभागस्तरावर जाऊन शेतीचे नुकसान, पिकांचे प्रश्न, विकासाचे प्रकल्प आदींबाबत आढावा घेण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी श्री. शिंदे यांच्या हस्ते महानगरपालिकेच्यावतीने सुमारे ४ कोटी रुपये खर्चून उभारणी केलेल्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. मैदानाच्या उभारणीमध्ये काम केलेले कंत्राटदार, मनपा अभियंते यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री उदय सामंत, तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप लांडे, शरद सोनवणे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त मनपा आयुक्त विलास कानडे, माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे आदी उपस्थित होते.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/SEaQBlH
https://ift.tt/dQ19FGf

No comments:

Post a Comment