संगीताची जाण समृद्ध करण्यासाठी ‘रागरंजन’ उपयुक्त – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Thursday, August 4, 2022

संगीताची जाण समृद्ध करण्यासाठी ‘रागरंजन’ उपयुक्त – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. ४ : संगीत हे ईश्वरासोबत जोडले जाण्याचे एक प्रभावी माध्यम असून त्याची साधना केल्याने मानसिक स्वास्थही चांगले राहते. संगीतात ही नैसर्गिक क्षमता असल्यामुळे मुलांना बालपणापासून शारीरिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी संगीताची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. शास्त्रीय संगीताचे आध्यात्मिक महात्म्य ‘रागरंजन’ या पुस्तकात अंतर्भूत असून या क्षेत्रात कारकीर्द घडविणाऱ्यांसाठी रागरंजन हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राजभवनच्या दरबार सभागृहात डॉ. तनुजा नाफडे लिखित ‘रागरंजन’ या पुस्तकाचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांता कुमारी, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, ओम साई पब्लिकेशनचे प्रमुख तथा प्रकाशक गणेश राऊत यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले की, संगीत ही निसर्गाला जोडणारे माध्यम आहे. त्याच्या माध्यमातून आपण अध्यात्माकडे वळतो. संगीताची भाषा पशुपक्ष्यांनाही कळते. मनुष्याच्या उत्पत्तीपासून संगीत आहे. संगीताला जात, धर्म, पंथ नसतो. सर्व दिशांना अध्यात्मिक, लोकगीत, सांस्कृतिक संगीताचे सूर निनादत असतात. तामिळ संगीतकार सुब्बालक्ष्मी यांचे संस्कृत गीत तामिळनाडूसह हिमाचलप्रदेशमधील बद्रीनाथ येथेही प्रभातवेळी ऐकायला मिळते. संगीतामुळे मनुष्याचे मानसिक स्थास्थ्य सदृढ राहण्यास मदत होते. संगीतसाधना व तपस्येच्या माध्यमातून रुग्णांवर उपचारपध्दती सुध्दा विकसित करण्यात आली आहे. प्राचीन काळात गुरुकुलमध्ये अन्न शिजवणे, स्वच्छता करणे अशा सोळा प्रकारच्या विद्या शिकविल्या जात होत्या. त्यात संगिताचाही समावेश असायचा. भारतीय संगीताविषयी पाश्चात्य देशातही आवड निर्माण झाली आहे. रागरंजन पुस्तकातून संगीतप्रेमींना राग व रंजन म्हणजे संगीताचा आनंद या आशय संदर्भात जाण होईल, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

संगीत क्षेत्रातील अनुभव, बालपणापासूनची साधना, शास्त्रीय संगीतातील बारकावे, व्यक्तिमत्व घडविण्यासाठी संगिताचे महत्व, त्या माध्यमातून उपचार यासंबंधी श्रीमती नाफडे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले. श्री. अपराजित व श्रीमती व्ही. शांता कुमारी यांचीही यावेळी भाषणे झाली.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/iBubGFo
https://ift.tt/kX32CE0

No comments:

Post a Comment