पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - latur saptrang

Breaking

Monday, August 1, 2022

पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद, दि.31 (जिमाका) :- राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी पाच कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे कालपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिल्लोड येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून मुख्यमंत्री सायंकाळी शहरात परतले. त्यांनी शहराच्या विविध भागातील महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अभिवादनप्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी त्यांनी संवादही साधला. या पुतळ्याच्या सुशोभिकरणासह परिसरासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. या प्रक्रियेसंदर्भात मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसोबत आपली चर्चा झाली असल्याची माहितीही श्री.शिंदे यांनी दिली. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित असणाऱ्या तरुणांशी त्यांनी अनौपचारिक संवादही साधला. या पोलीस भरतीमुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

 

त्यानंतर त्यांनी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भडकल गेट येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, अतुल सावे आदीं उपस्थित होते.

उस्मानपूरा येथील गुरूद्वारास भेट

उस्मानपुरा येथील गुरूद्वारास मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी गुरूद्वाराच्या व्यवस्थापन समिती कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक संवाद साधून कृतज्ञता व्यक्त केली.

 

******



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Pz7OZDo
https://ift.tt/RbNDSGe

No comments:

Post a Comment